मुंबई : मुलुंडमध्ये या आठवड्यात १८ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. गुरुवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गोरेगाव – मुलुंड जोड रस्त्यावरील पुलाच्या कामामुळे बाधित होणारी जलवाहिनी वळविण्याच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

गोरेगाव – मुलुंड जोड रस्त्यावरील पुलाच्या कामामुळे १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. त्यामुळे ‘टी’ विभागामध्ये मॅरेथॉन मॅक्सिमा इमारत ते तानसा पुलादरम्यान रस्त्यालगत असणारी जलवाहिनी वळविण्यात येणार असून, १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी दोन ठिकाणी जोडण्याचे काम गुरूवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी पहाटे ४ पर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामादरम्यान मुलुंडचा समावेश असलेल्या ‘टी‘ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा १८ तास पूर्णपणे बंद राहणार आहे. विशेष म्हणजे ज्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे त्या भागात २४ तास पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे या भागातील लोकांना या कामाचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

या भागातील पाणी पुरवठा बंद…

गोरेगाव – मुलुंड जोड रस्त्यालगतचा परिसर मुलुंड (पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग (एल. बी. एस. रोड) लगतचा परिसर मुलुंड (पश्चिम), जवाहरलाल नेहरु मार्ग (जे. एन. रोड), देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राऊंड रोड), डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, महात्मा गांधी मार्ग (एम. जी. रोड), एन. एस. मार्ग, एस. एन. मार्ग, आर. एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी. मार्ग, मदन मोहन मालवीय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुर गाव, इत्यादी. (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ २४ तास) (पाणीपुरवठा बंद राहणार) त्यामुळे या विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा.

पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून – गाळून प्यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

कसा आहे प्रकल्प….

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. गोरेगाव मुलुंड जोडरस्त्याचे काम सध्या वेगात सुरू असून या प्रकल्पाच्या आड येणारे अडथळेही दूर होत आहेत. या प्रकल्पांतर्गत बोगदा खणण्याच्या कामालाही लवकरच सुरूवात होण्याची शक्यता असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर येत्या काही वर्षात गोरेगाव ते मुलुंड प्रवासाचा वेळ पाऊण तासाने वाचणार आहे. एक तासाचा प्रवास २० मिनिटात होऊ शकणार आहे. तसेच प्रवासाचे अंतर सुमारे ८.८० किलोमीटरने कमी होणार आहे