मुंबई : अटकेमुळे रखडलेल्या लग्नासाठी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाने रद्द केला. गुन्ह्याचे गांभीर्य आणि गुन्ह्याशी संबंधित पुराव्याकडे सत्र न्यायालयाने दुर्लक्ष केल्याची टीका करताना उपरोक्त निकषावर आरोपीला जामीन मंजूर करणे ही चिंताजनक बाब आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. तसेच, आरोपीला तातडीने पोलिसांसमोर प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले.
पीडितेचा जबाब हा घटनाक्रमाशी सुसंगत आहे. तसेच, घटनास्थळाचा पंचनामा आणि तिच्या काकांच्या साक्षीसह इतर पुरावे तिने सांगितलेला घटनाक्रम योग्य असल्याचे दर्शवितात. परंतु, कनिष्ठ न्यायालयाने पीडितेच्या शरीरावर जखमा नसणे याला तसेच आरोपीच्या रखडलेल्या लग्नाला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व दिल्याचे ताशेरेही न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या एकलपीठाने आरोपीचा जामीन रद्द करताना ओढले.
न्यायालयाने आरोपीला जामीन देताना विचारात घेतलेले कारण अधिकच त्रासदायक आणि वेदनादायक असून ते जामिनासाठी आधार नसल्याचेही एकलपीठाने आदेशात नोंदवले. तसेच, असे आदेश आरोपीने केलेल्या कृतीचे, गुन्ह्याचे गांभीर्य कमी करते, असेही न्यायालयाने आरोपीचा जामीन रद्द करून त्याला तातडीने पोलिसांसमोर प्रत्यार्पण करण्याचे आदेश देताना स्पष्ट केले.
प्रकरण काय ?
अंधेरी येथील डीएन नगर पोलिस स्टेशन हद्दीत गेल्या वर्षी आरोपीसह तीनजणांनी पीडितेला शीतपेयात नशेचे औषध दिले. नंतर तिला बेदम मारहाण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. तथापि, सत्र न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात आरोपीला रखड़लेल्या लग्नासाठी जामीन मंजूर केला होता. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.