मुंबई : ऑगस्ट अखेरीस सुरू झालेली दुसरी विशेष फेरी अकरावी प्रवेशाची अंतिम फेरी असेल, असे जाहीर केल्यानंतर शिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रियेची आणखी एक फेरी घेण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले असून, ३ सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. दरम्यान, आतापर्यंत प्रवेश अर्जाचे दोन्ही भाग भरणाऱ्या १३ लाख ४३ हजार ९६९ पैकी १३ लाख १२ हजार ७८२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
अकरावी प्रवेशाच्या चार नियमित आणि दोन अतिरिक्त विशेष फेऱ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. त्यापैकी दुसऱ्या विशेष फेरीत कला शाखेसाठी १० हजार ७४७, वाणिज्य शाखेसाठी १० हजार ७१९ आणि विज्ञान शाखेसाठी १६ हजार ३८७ अशा एकूण ३८ हजार ८५३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. त्यापैकी ३७ हजार ०७४ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले. आता अर्जाचे भाग एक आणि दोन निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी फक्त ३१ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत.
या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक फेरी राबवण्यात येणार असून ३ सप्टेंबरला नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी किंवा भाग-१ मध्ये दुरुस्ती करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ४ सप्टेंबरला प्रवेश क्षमता वाढवली जाणार असून ५ सप्टेंबरला रिक्त जागा प्रदर्शित केल्या जाणार आहेत. ६ ते ७ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थी प्रवेश अर्जाचा भाग २ म्हणजेच पसंतीक्रम भरू शकतील. ८ सप्टेंबर रोजी निवड यादी जाहीर होणार असून ८ व ९ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचे आहेत.