मुंबई : पूर्व उपनगरामध्ये एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिघांनी बलात्कार केल्याचा प्रकारउघडकीस आला आहे. हे तिन्ही आरोपी सुरक्षा रक्षक आहेत. जानेवारी ते एप्रिल दरम्यान आरोपी पीडित मुलीवर अत्याचार करीत होते. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही बाब उघड झाली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
पीडित मुलगी १३ वर्षांची असून ती पूर्व उपनगरात वास्तव्याला आहे. येथील एका मोठ्या गृहसंकुलात तिची आई सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. पीडित मुलीच्या आईला भेटण्यासाठी ती तिथे यायची. जानेवारी महिन्यात तिची ओळख याच परिसरातील इमारतीत काम करणाऱ्या ४६ वर्षीय सुरक्षा रक्षकाशी झाली. तो तिच्या आईच्या परिचयाचा होता. त्याने पीडितेशी ओळख वाढवली.
तीन महिने अत्याचार
आरोपीने पीडित मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन २४ जानेवारी रोजी तिच्यावर याच इमारतीच्या परिसरात बलात्कार केला. हा प्रकार नंतर त्याने आपले अन्य दोन सुरक्षा रक्षक असलेल्या सहकाऱ्यांना सांगितला. त्यांनीही मुलीला आमिष दाखवून, धमकावून बलात्कार केला. २४ जानेवारी ते ३० एप्रिलदरम्यान तिन्ही आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होते. अखेर मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार तिच्या आईला समजला.
तिघांना अटक
पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले. गुन्हे प्रकटीकरण शाखेने तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पीडित मुलीवर मुंबईतील रुग्णालयात उपचार करण्यात आले असून तिची प्रकृती ठिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींविरोधात यापूर्वी कुठल्याही गुन्ह्याची नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
अल्पवयीन मुलांच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ
मुंबईत अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात सातत्याने वाढ होत आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी पोक्सोअंतर्गत २०२० मध्ये ९३८, २०२१ मध्ये १ हजार ६६ आणि २०२२ मध्ये १ हजार १५७ गुन्हे नोंदविण्यात आले होते. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये अल्पवयीन मुलांवरील लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये ७५ टक्क्यांनी, तर विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२४ मध्ये बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये १ हजार ३४१ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती, तर २०२३ मध्ये अशा स्वरूपाचे १ हजार १०८ गुन्हे नोंदवले गेले होते.
२०२४ मध्ये नोंदलेल्या या गुन्ह्यांमध्ये ६०९ बलात्काराच्या, ६६७ विनयभंगाच्या, आणि ३५ छेडछाड व अश्लील शेरेबाजीच्या घटनांचा समावेश आहे. अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगार पीडित अल्पवयीन मुलीच्या ओळखीचेच असल्याचे आढळले आहे. प्रभावी जनजागृती आणि पीडित मुली तक्रार नोंदवण्यासाठी पुढे येत असल्यामुळे प्रकरणांची संख्या वाढत असल्याचे पोलिसांना सांगितले.