मुंबईमधील रुग्णदुपटीचा काळ सरासरी ११५ दिवसांवर, तर रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ८८ टक्क्यांवर पोहोचले असून मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. मुंबईत २४ तासांत  १,४७० जणांना करोनाची बाधा झाली असून ४८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवानंतर मुंबईतील करोनाबाधितांची संख्या वाढू लागली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. आतापर्यंत मुंबईमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या दोन लाख ४८ हजार ८०४ वर पोहोचली आहे. शुक्रवारी मृत्यू झालेल्या ४८ जणांमध्ये ३७ पुरुष, तर ११ महिलांचा समावेश आहे. यापैकी ३६ जणंना दीर्घकालीन आजार होता. विविध रुग्णालयात उपचार घेणारे १,६९६ रुग्ण शुक्रवारी करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत दोन लाख १८ हजार २५४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आजघडीला विविध रुग्णालयांमध्ये १९ हजार २४६ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत मुंबईत १४ लाख २३ हजार १६० करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे ८,५१८ इमारती टाळेबंद, तर ६२० झोपडपट्टय़ा आणि चाळी प्रतिबंधित क्षेत्र  जाहीर करण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यात ९०० नवे करोना रुग्ण

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी ९०० नवे करोनाबाधित  आढळून आल्याने करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २ लाख ५ हजार ४३४ वर पोहोचली आहे. दिवसभरात १५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ५ हजार १९६ झाली आहे.  शुक्रवारी नोंद झालेल्या  रुग्णांमध्ये ठाणे शहरातील २४४, नवी मुंबईतील १९६, कल्याण-डोंबिवली शहरातील १७८, मीरा-भाईंदरमधील ९३, ठाणे ग्रामीणमधील ७१, बदलापूरमधील ४५, उल्हासनगरमधील ३६, भिवंडी शहरातील २२ आणि अंबरनाथमधील १५ रुग्णांचा समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai 1470 people are affected by corona in a day abn
First published on: 24-10-2020 at 00:26 IST