मुंबई : अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. त्यानुसार सात महिन्यांच्या कालावधीत अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई आणि नवी मुंबई प्रवास अति वेगवान करण्यासाठी शिवडी – न्हावाशेवा दरम्यान २१.८ किमी लांबीचा सागरी सेतू बांधला. हा सागरी सेतू जानेवारीमध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. या सागरी सेतूमुळे मुंबई – नवी मुंबई अंतर बारा ते पंधरा मिनिटांत पार करणे शक्य झाले आहे. मात्र या अतिवेगवान प्रवासासाठी वाहनचालक, प्रवाशांना पथकर मोजावा लागत आहे. हा पथकर अधिक असल्याने सुरुवातीला अटल सेतूला म्हणावा तसा प्रतिसाद मिळला नाही. मात्र आता हळूहळू अटल सेतूवरून धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे.

हेही वाचा – ठाणे खाडी किनारा मार्ग प्रकल्प : प्रकल्पासाठीचे ९२ टक्के भूसंपादन पूर्ण, उर्वरित आठ टक्के भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती

गेल्या सात महिन्यांमध्ये १३ जानेवारी ते २५ ऑगस्ट २०२४ दरम्यान या सेतूवरून ५० लाख ४ हजार ३५० वाहनांनी प्रवास केला. अटल सेतूवरून दिवसाला ७० हजार वाहने धावतील अशी अपेक्षा एमएमआरडीला होती. पण प्रत्यक्षात मात्र दिवसाला २४ ते २५ हजार वाहने अटल सेतूवरून प्रवास करत आहेत. हा प्रतिसाद कमी असला तरी समाधानकारक असल्याचे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. अटल सेतूवरून धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत येत्या काळात वाढ होईल, अशी अपेक्षाही एमएमआरडीएने व्यक्त केली आहे.

हेही वाचा – मुंबई – ठाण्यात लाखमोलाच्या दहीहंड्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी – वरळी जोडरस्त्याचे काम पुढील वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अटल सेतूवरून मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर थेट आणि अतिवेगवान पोहोचता यावे यासाठी एमएमआरडीएकडून एक उन्नत मार्गही बांधण्यात येत आहे. याचे कामही येत्या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही जोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अटल सेतूवरील वाहन संख्या वाढेल, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.