मुंबई : मध्य रेल्वेवर वातानुकूलित नवीन लोकल फेऱ्यांची भर पडल्यानंतरही प्रवासी संख्येत फारशी वाढ झालेली नाही. सध्या दररोजच्या ६० लोकल फेऱ्यांमधून सरासरी १२५ प्रवासीच प्रवास करीत आहेत. भाडेदर कमी झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा मार्गावर १९ फेब्रुवारीपासून नवीन वातानुकूलित लोकल फेऱ्या सोडण्यास सुरुवात झाली. त्यात ३४ वातानुकूलित फेऱ्यांची भर पडली. यापूर्वी सीएसएमटी ते कल्याण मार्गावर दहा वातानुकूलित लोकल फेऱ्यांची सेवा होती. तर सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव या हार्बवर १६ फेऱ्या होत होत्या.

नवीन फेऱ्यांची भर पडल्याने दररोज ६० फेऱ्या सुरू आहेत. मात्र त्यानंतरही दररोज सरासरी १२५ प्रवासी प्रवास करीत आहेत. नवीन फेऱ्या सुरू होण्याआधी प्रत्येक दिवशी वातानुकूलित लोकल फेऱ्यांमधून ५० ते ५५ प्रवासीच प्रवास करत होते. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ६० फेऱ्यांमुळे २१ फेब्रुवारीला एकूण १४५ पासची आणि २२९ तिकीटांची विक्री झाली. यातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत दोन लाख ९६ हजार ८८३ रुपये उत्पन्न मिळाले. मुख्य मार्गावरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या १० वरून ४४ करतानाच यातील २५ फेऱ्या जलद मार्गावर आहेत.

प्रवासी क्षमता ५,९६४

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका वातानुकूलित लोकल गाडीची एकूण प्रवासी क्षमता ५,९६४ आहे. यात १,०२८ प्रवासी आसन क्षमता व ४,९३६ प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतात. सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर तीन लोकल आणि हार्बरवर एक लोकल प्रवाशांच्या सेवेत असून त्यांच्या ६० लोकल फेऱ्या होतात. सध्या मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद अल्पच आहे.