मुंबई : कबुतरांची पिसे व त्यांच्या विष्ठेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने मुंबईतील कबुतरखान्यांवर महानगरपालिका प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येत आहे. तसेच, शासन आदेशाला न जुमानता अनेकजण कबुतरांना दाणे टाकत असून पालिकेने आता खाद्य टाकण्याविरोधातील कारवाई आणखी तीव्र केली आहे. महापालिकेने कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी एका महिन्यात तब्बल २४९ जणांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यातून महापालिकेच्या तिजोरीत एकूण १ लाख २४ हजार ४०० रुपयांचा महसूल जमा झाला. ही कारवाई पुढेही सुरूच राहणार आहे.
मुंबईत ५१ कबुतरखाने असून त्यातील काही कबुतरखाने हे शंभर – दीडशे वर्ष जुने आहेत. कबुतरांमुळे निर्माण झालेले धोके लक्षात घेऊन पावसाळी अधिवेशनात २ जुलै रोजी मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम राबविण्याची मोहीम हाती घेण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला देण्यात आले. त्यानुसार महापालिकेने वेळ न दवडता मुंबईतील कबुतरखान्यांवर कारवाई सुरु केली. तसेच, ३ जुलैपासून कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईला वेग देण्यात आला. कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड वसूल केला जातो. त्यानुसार १३ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत मुंबईत कबुतरांना दाणे टाकल्याप्रकरणी २४९ जणांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. या कारवाईतून तब्बल १ लाख २४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात महापालिकेला यश आले.
दादरमधील कबुतरखान्यात दाणे टाकल्याप्रकरणी सर्वाधिक म्हणजेच ६७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून २९ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच, न्यायालयाच्या आदेशानुसार दोन दिवसांपूर्वीच कबुतरांना दाणे टाकल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात एक गुन्हा देखील नोंदविण्यात आला आहे. महापालिकेच्या विभाग एम पूर्व, विभाग एम पश्चिम, विभाग एल, विभाग एफ एन, विभाग जी एस आदींमधून एकही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. शासनदरबारी ५१ कबुतरखान्यांची नोंद असली तरीही मुंबईत अनेक अनधिकृत कबुतरखाने आहेत. त्यामुळे कबुतरांना दाणे टाकण्याबाबतची सर्व प्रकरणे समोर येत नसल्याने महापालिकेला कारवाई करण्यात अडथळे येत आहेत.
पुरातन वास्तू झाकली
दरम्यान, मुंबईतील विविध कबुतरखान्यांच्या परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे. नागरिकांना दाणे टाकण्यास प्रतिबंध करणे, जनजागृती फलक लावणे, कबुतराचे खाद्य विकण्यासाठी मज्जाव करणे आदी उपाययोजना महापालिकेने हाती घेतल्या आहेत. पावसाळी अधिवेशनात दिलेल्या आदेशानंतर महापालिकेने प्रथम दादरमधील कबुतरखान्यावर कारवाई केली. या कबुतरखान्याचा पुरातन वास्तू जतन श्रेणीमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे त्याचे विशेष महत्व आहे. मात्र, विविध उपाययोजना केल्यानंतरही तिथल्या कबुतरांचा प्रश्न सुटत नसल्याने महापालिकेने अखेर बांबू आणि ताडपत्रीच्या साहाय्याने कबुतरखाना झाकून टाकला. त्यामुळे पुरातन वास्तू जतन श्रेणीमध्ये समाविष्ट असलेला दादरमधील कबुतरखाना आणखी किती दिवस ताडपत्रीत राहील, हे अद्याप अस्पष्ट आहे.