मुंबई : मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्यासाठी तत्काळ मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिल्यानंतर मुंबईतील कबुतरखान्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. मात्र ही कारवाई केवळ दादरचा कबुतरखाना हटवण्यासाठी सुरू असल्याची चर्चा आहे. कबुतरखान्याच्या आजूबाजूच्या नवीन इमारतींमधील सदनिकांची विक्री होत नसल्यामुळे विकासकांच्या दबावामुळे ही कारवाई सुरू असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे काही धार्मिक समुदायामुळे मुंबई महापालिका ही कारवाई आक्रमकपणे करत नसल्याचीही चर्चा आहे.

दादरचा कबुतरखाना हटवण्याची मागणी अधूनमधून पुन्हा डोके वर काढत असते. काही महिन्यांपूर्वी दादरचा कबुतरखाना अन्य ठिकाणी हलवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्यानंतर हा विषय थांबला. परंतु, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुंबईतील कबुतरखाने हटवण्यासाठी तत्काळ मोहीम राबवण्याचे आदेश राज्य सरकारने मुंबई महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने दादर येथील सुप्रसिद्ध कबुतरखान्यावरील जाळीचे बांधकाम, छत, धान्य साठवण्याची जागा असे सगळे बांधकाम हटवले. तसेच कबुतरांना घालण्यासाठी साठवलेले खाद्यही जप्त केले. परंतु, त्यानंतरही हा कबुतरखाना सुरूच असून खाद्य टाकण्यात येत आहे. तसेच दादरच्या कबुतरखान्याव्यतिरिक्त मुंबईतील इतर ठिकाणच्या कबुतरखान्यांवर या पद्धतीची मोठी कारवाई झालेली नाही. त्यावरून आता स्थानिक पातळीवर दोन्ही बाजूने वाद सुरू आहेत. समाजमाध्यमांवरही याबाबत चर्चा सुरू आहे.

क्लीन अप मार्शनल नेमावे

मुंबई महापालिकेने दादरच्या कबुतरखान्यावर कारवाई केली. पण तिथे अजूनही काही मंडळी धान्य टाकत आहेत. त्यामुळे कबुतरांचा त्रास कमी झालेला नाही. महापालिकेने तेथे पूर्णवेळ क्लीन अप मार्शल नेमावा व हा कबुतरखाना बंद करावा अशी मागणी मनसेच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष जय श्रृंगारपुरे यांनी केली.

न्यायालयात दाद मागू…

जैन धर्मामध्ये सर्व प्राण्यांना समान लेखले आहे. सर्व प्राण्यांचा जगण्याचा हक्क आहे. अचानक घर उद्ध्वस्त करून कबुतरांना बेघर करणे योग्य नाही. त्यामुळे सरकारने ही कारवाई थांबवली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, असे जैन विश्व संघटन या संघटनेचे वकील धनपाल जैन यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोप – प्रत्यारोप

दादरच्या कबुतरखान्याच्या आसपासच्या इमारतीतील सदनिका विकल्या जात नसल्यामुळे विकासकांच्या दबावामुळे ही कारवाई होत असल्याचा आरोप जैन यांनी केला आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे आरोग्याला धोका आहे असा काही शास्त्रीय अहवाल असेल तर तो मुंबई महापालिकेने जाहीर करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. कबुतरखान्यांमुळे सदनिका विकल्या जात नसतील हे खरे असेल तर कबुतरांमुळे होणारा त्रासही खरा आहे याचाच हा पुरावा आहे, असे प्रत्युत्तर जय श्रुंगारपुरे यांनी दिले आहे.