तब्बल दीड महिन्यानंतर मुंबईवर लागलेला प्रदूषणाचा लाल बावटा अखेरीस सोमवारी खाली उतरला. सूक्ष्म धूलिकणांची हवेतील संख्या धोकादायक पातळीवरून समाधानकारक पातळीवर उतरली. याचदरम्यान शहरातील बहुतांश भागात ओझोनची पातळी मात्र वाढली होती. वातावरणाच्या वरच्या थरातील ओझोनची मानवाला मदत होत असली तरी जमिनीलगत वाढलेला ओझोन शरीरास घातक ठरतो.
हिवाळ्याच्या आगमनासोबत प्रदूषकांच्या पातळीत झालेली तीनपट वाढ वेगवेगळ्या कारणांनी कमी होत नव्हती. त्यातच देवनार कचराभूमीला लागलेल्या आगीमुळे मुंबईला प्रदूषणाबाबतीत दिल्लीच्या पुढे नेऊन ठेवले. आग विझल्यानंतर आठवडाभरात मुंबईची हवा पुन्हा ताजीतवानी झाली आहे. समुद्रावरून येणारे जोरदार वारे मुंबईची हवा नेहमीच शुद्ध करतात, मात्र हिवाळा सुरू होता होता हे वारे मंदावतात. त्याचा फटका मुंबईकरांना बसला.
२२ डिसेंबरपासून मुंबईच्या हवेची पातळी घसरली. अंधेरी, चेंबूर, माझगाव या उपनगरांमध्ये प्रदूषण जास्त असल्याचे सफर प्रकल्पांतर्गत बसवलेल्या मापन यंत्रणेवर दिसू लागले. जानेवारीतील काही दिवसांचा अपवाद वगळता सर्व उपनगरांमध्ये तसेच नवी मुंबईत प्रदूषणाची पातळी सुरक्षित पातळीपेक्षा तीनपटीने वाढली. त्यातच गेल्या आठवडय़ात देवनार कचराभूमीतील आगीने संपूर्ण शहरालाच कोंडीत पकडले. उपनगरांतील हवा अतिधोकादायक पातळीवर गेली.

ओझोन मात्र वाढला..
पृथ्वीभोवती असलेल्या ओझोनच्या थरामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून रक्षण होते. मात्र जमिनीलगतचा ओझोन हा विषारी मानला जातो. शरीरात गेल्यास खोकला, श्वास घेण्यास अडथळे तसेच फुप्फुसात जळल्यासारखे वाटू शकते. या ओझोनचा शेतांवर तसेच झाडांवरही विपरीत परिणाम होतो. सल्फर ऑक्साइड तसेच कार्बन मोनॉक्साइड या वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या वायूंच्या संयुगातून ओझोन तयार होतो. सध्या मुंबईतील बहुतांश उपनगरात ओझोनची पातळी शंभरहून अधिक वाढली आहे. हे प्रमाण धोकादायक नसले तरी सुरक्षित पातळीपेक्षा अधिक आहे.

दुपारी गारठा..
मुंबई : मार्चमधील उन्हाळ्याकडे एकीकडे हवामानाचा प्रवास सुरू झालेला असतानाच ईशान्येकडील थंड वाऱ्यांमुळे दुपारी गारठा जाणवत आहे. सकाळचे किमान तापमान १५ अंश से. खाली गेले असताना दुपारीही २७ ते २८ अंश से. दरम्यान कमाल तापमान राहत आहे.
जानेवारीच्या अखेरच्या आठवडय़ात दुपारच्या तापमानाने ३०चा पल्ला पार केला होता. मात्र गेल्या चार दिवसात थंड वारे प्रभावी ठरत आहेत. मध्यरात्रीनंतर पूर्व तसेच ईशान्य वाऱ्यांचा प्रभाव वाढत असल्याने सकाळचे तापमान कमी होतेच, पण त्यामुळे दुपारच्या कमाल तापमानावरही परिणाम होत आहे. शनिवारी २८ अंश से., रविवारी, २८ अंश से. तर सोमवारी २८ अंश से. कमाल तापमान राहिले.पुढील दिवसात कमाल व किमान तापमानातही दोन ते तीन अंश से.ने वाढ होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने नोंदवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.