मुंबई : शहर आणि उपनगरांत दोन दिवस झालेल्या पावसामुळे हवा दर्जा निर्देशांकात सुधारणा झाली आहे. अनेक भागांत सातत्याने वाईट दर्जाची नोंद झाली होती. सोमवारी हवेचा दर्जा समाधानकारक होता. मुंबई आणि परिसरात रविवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली सोमवारीही काही भागात तुरळक पाऊस पडला. पावसामुळे मुंबईची हवा स्वच्छ झाली आहे. हवेचा दर्जा सोमवारी समाधानकारक पातळीवर नोंदवला गेला. रविवारीही हा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक होता. गेले काही दिवस मुंबईत दिसणारे धुरके दूर होऊन वातावरणात बदल जाणवत आहे. हवा दर्जा निर्देशांकात झालेला हा सकारात्मक बदल पुढील एक दोन दिवस कायम असेल. मुंबईतील हवा गेले अनेक दिवस खालावलेली होती.
सोमवारी मुंबईमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार कुलाबा, माझगाव, विलेपार्ले, वरळी येथे समाधानकारक हवा असल्याचे नोंदले गेले. हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार सोमवारी सायंकाळी कुलाबा येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ४१ होता, माझगाव ३५, वरळी २३, विलेपार्ले ३७, पवई येथील ६५ होता. तसेच उर्वरीत सर्व केंद्रावर हवेचा स्तर समाधानकारक होता. गेले अनेक दिवस मुंबईतील काही भागातील हवा गुणवत्ता ही मध्यम ते वाईट श्रेणीत नोंदली जात होती. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळे मुंबईकरांना प्रदूषणविरहीत हवा अनुभवता येत आहे.
हेही वाचा >>>मुंबई : बनावट कागदपत्रांद्वारे पावणेसात कोटी रुपयांची फसवणूक, दलाली पेढीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
दरम्यान, पालघर जिल्ह्य़ात रविवार पहाटेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्य़ातील शेतकरी, गवत व्यापारी, वीट उत्पादक, बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला उत्पादनावर बुरशीजन्य रोग पसरण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. जिल्ह्य़ात २४ तासांत सरासरी २३.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, भिवंडी, शहापूर आणि अंबरनाथ ग्रामीण भागांत झालेल्या अवकाळी पावसाने भातपिकाचे नुकसान झाले. शनिवारी आणि रविवारी अशा सलग दोन दिवसांत या भागांत अवकाळी पाउस झाला. सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी भेंडी, काकडी, कारली अशा वेगवेगळय़ा फळ, वेलवर्गीय रोपांची लागवड केली आहे. गारपिटीने ही लागवड झोडपून काढल्याने रब्बी हंगाम हातून जाण्याची भीती आहे.