मुंबई : दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच मुंबईची हवा खालावली होती. अनेक भागात वाईट ते अतिवाईट हवेची नोंद झाली. काही भागात सलग दोन दिवस हवा गुणवत्ता निर्देशांक २००च्या पुढे होता. दरम्यान, गुरुवारी मुंबईच्या हवेत सुधारणा झाली होती. मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तसेच गुरुवारी देखील मुंबईत पावसाने हजेरी लावली. परिणामी हवा गुणवत्तेत सुधारणा झाली. मुंबईचा एकूण हवा निर्देशांक गुरुवारी १०९ इतका होता. म्हणजेच मध्यम श्रेणीत.
मुंबईत मागील दोन दिवस हवेचा दर्जा खालावला होता. नरक चतुर्दशी दिवशी मुंबईचा हवा निर्देशांक १८८ तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवा निर्देशांक २११ इतका नोंदला गेला. त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळी नेमकी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुंबईच्या हवेत सुधारणा झाली. गुरुवारी वांद्रे कुर्ला संकुल येथील हवा निर्देशांक ९९, बोरिवली ६५, चेंबूर ९४, कुलाबा ९५, भांडूप ५३, कुर्ला ८८, शिवडी ६९, शीव ६०, विलेपार्ले ९३, वरळी येथील हवा निर्देशांक ८३ इतका होता. म्हणजेच येथे ‘समाधानकारक हवेची नोंद झाली. तर इतर भागातील हवा मध्यम श्रेणीत नोंदली गेली.
सर्वाधिक नोंद ऑक्टोबर महिन्यात
ऑक्टोबर महिन्यात मुंबईच्या हवेतील पीएम२.५ आणि पीएम१० या दोन मुख्य प्रदूषकांच्या दैनंदिन सरासरी पातळीत जानेवारी २०२५ पासूनची सर्वाधिक नोंद नोंदविण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात १९ कंटिन्युअस अँबिअंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्सवर पीएम२.५ ची या वर्षातील सर्वाधिक नोंद झाली, तर सात कंटिन्युअस अँबिअंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्सवर पीएम १० ची सर्वाधिक नोंद दिसून आली. ही वाढ १८ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान झालेली दिसून आली. मुंबईच्या हवेतील पीएम२.५ आणि पीएम१० या दोन महत्वाच्या प्रदूषकांच्या नोंदीच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपलब्ध आकडेवारीचे विश्लेषण ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अॅण्ड क्लिन एअर’ यांनी केले आहे. या नोंदी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजी (आयआयटीएम) आणि मुंबई महानगरपालिकेने स्थापित केलेल्या कंटिन्युअस अँबिअंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्सद्वारे केल्या जातात.
