मुंबई : मुंबईतील हवेचा निर्देशांक मंगळवारी ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला असून माझगाव , सिद्धार्थ नगर वरळी आणि मालाड येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. मुंबईतील हवेची गुणवत्ता सोमवारीही ‘मध्यम’ श्रेणीत होती.
‘समीर’ ॲपनुसार मंगळवारी मुंबईच्या हवेचा निर्देशांक १४८ वर पोहोचला होता. समीर ॲपवरील नोंदीनुसार माझगाव येथील हवा निर्देशांक मंगळवारी २४१,तसेच सिद्धार्थ नगर वरळी येथे २८८, तर मालाड येथील २८० इतका होता. तसेच वांद्रे कुर्ला संकुल हवा निर्देशांक २२२ इतका होता. दरम्यान, हवा मंगळवारी संपूर्ण दिवसभर ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली. याचबरोबर बोरिवली येथील हवा निर्देशांक १२२, देवनार १७९, घाटकोपर १५९, कुर्ला ११०, मुलुंड १२४ आणि नेव्ही नगर कुलाबा येथील १४० इतका होता.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांक ०-५० म्हणजे ‘चांगला’, ५१-१०० ‘समाधानकारक’, १०१-२०० ‘मध्यम’, २०१-३०० ‘वाईट’, ३०१-४०० ‘अत्यंत वाईट’ आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे ‘अतिधोकादायक’ समजली जाते. भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरासाठी दैनंदिन अंदाजामध्ये सकाळी धुके पडण्याची शक्यता आणि मुख्यतः निरभ्र आकाश असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर, किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
मुंबईतील प्रदूषण का वाढते ?
गेल्या दोन – तीन वर्षांपासून मुंबईतील प्रदुषणाचे प्रमाण वाढत असल्याचे विविध संस्थांनी सादर केलेल्या अहवालांतून निदर्शनास आले आहे. दरवर्षी साधारण थंडीची चाहुल लागताच मुंबईच्या हवेचा दर्जाही ढासळू लागतो. गेल्या वर्षी (२०२४) नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये मुंबईच्या हवेची स्थिती वाईट झाली होती. ती अगदी फेब्रुवारी अखेरपर्यंत वाईट होती. मुंबईतील वाऱ्यांची स्थिती पावसाळ्यानंतर बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषकांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धुलीकण हवेतच तरंगतात.
मुंबईतील प्रदुषणात नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे भर पडत आहे. अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा, निवासी – व्यावसायिक संकुले, नव्या प्रकल्पांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. त्याचप्रमाणे वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अति-अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. यामुळे प्रदुषण वाढत आहे.
काय काळजी घ्यावी ?
प्रदुषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार वाढत आहेत. दमा, क्षयरोग, न्युमोनिया, फुप्फुसांचा कर्करोग, श्वसन नलिकेला सूज, दम लागणे, ॲलर्जी, त्वचा कोरडी होणे, फाटणे, लाल होणे, खाज येणे अशा समस्यांचे प्रमाण वाढत आहे. ताप येणे, डोळे दुखणे, घसा दुखणे आदी आजार उद््भवतात. धुरक्याचे प्रमाण सकाळी आणि सायंकाळी जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. थंड पेय घ्यावे, तेलकट पदार्थ वर्ज्य करावे. लहान मुले, वृद्धांसाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी.
