मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क उत्पादन (कस्टम) विभागाने अमली पदार्थांच्या तस्करीचा कट उधळून लावला. या कारवाईत सुमारे ३० कोटी रुपये किंमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आणि तिघांना अटक करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून विमानतळावर अमली पदार्थांच्या तस्करीची प्रकरणे वाढली आहे. त्यामुळे सीमा शुल्क विभाग सतर्क झाला आहे. दरम्यान, बॅंकॉक येथून मुंबईत अमली पदार्थांची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती समी शुल्क विभागाला मिळाली होती. माहिती मिळताच विभागाने सापळा रचला आणि विमानातून आलेल्या दोन संशयीत प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी केली.
३० कोटींचे कोकेन जप्त
तपासणीदरम्यान प्रवाशांच्या २.९९२ किलो पांढऱ्या रंगाचा पावडरयुक्त पदार्थ सापडला. तो पदार्थ कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. त्याची बाजारात ३० कोटी रुपयांहून अधिक किंमत आहे. अधिकाऱ्यांनी या दोन्ही प्रवाशांना ताब्यात घेतले. हे अमली पदार्थ घेण्यासाठी एक व्यक्ती येणार होती. त्याची माहिती मिळवून त्यालाही अटक करण्यात आली. या तिन्ही आरोपींविरोधात अमली पदार्थविरोधी कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमानतळावरील यापूर्वीच्या महत्त्वपूर्ण घटना
- १९ सप्टेंबर २०२५ – मुंबई विमानतळावर हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला, त्याची अंदाजे किंमत २० कोटी आहे. या प्रकरणात दोन प्रवाशांना अटक करण्यात आली.
- मे २०२४ – एका परदेशी नागरिकाने ७७ कॅप्सूल्समध्ये कोकेन गिळून तस्करी करण्याचा प्रयत्न केला. या कॅप्सूल्स शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात आल्या आणि एकूण १.४६८ किलो कोकेन जप्त करण्यात आले. त्याची किंमत १५ कोटी होती.
- २२ सप्टेंबर २०२२ – जोहान्सबर्गहून आलेल्या दोन महिलांकडून ५ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले, त्याची अंदाजे किंमत २५ कोटी आहे. या महिलांना अटक करण्यात आली.
- ३० जून २०२३ – एका आफ्रिकन नागरिकाने ४३ हेरॉईन कॅप्सूल्स गिळून तस्करी करण्याचा प्रयत्न केला. या कॅप्सूल्स शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात आल्या आणि ५ कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आले.
एकूण जप्तीचा आढावा:
वर्ष | अमली पदार्थ | अंदाजे किंमत | अटक |
२०२५ | कोकेन, हायड्रोपोनिक गांजा | ५० कोटी | ५ |
२०२३ | कोकेन | ७० कोटी | ४ |
२०२२ | हेरॉईन | २५ कोटी | २ |
२०२३ | हेरॉईन | ५ कोटी | १ |