मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत १४ कोटी ५० लाख रुपयांच्या हायड्रोपोनिक गांजासह एका प्रवाशाला अटक केली. आरोपीने मोठ्या हुशारीने त्याच्या ट्रॉलीबॅगमधील कपड्यांमध्ये गांजा लपवलेला होता.
सीमा शुल्क विभागाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकहून विमानाने आलेल्या एका प्रवाशाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या बॅगच्या तपासणीत १४ किलो ५४८ ग्रॅम वजनाचा हिरव्या रंगाचा पदार्थ मिळाला, तो हायड्रोपोनिक गांजा (मारिजुआना) असल्याचा संशय होता. या अमली पदार्थाचा नमुना चाचणी कीटमध्ये तपासण्यात आला आणि तो हायड्रोपोनिक गांजा असल्याचे स्पष्ट झाले. जप्त केलेल्या पदार्थाची बाजारातील बेकायदेशीर किंमत १४ कोटी ५० लाख रुपये आहे, असे सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले. तस्करीसाठी या व्यक्तीला कमिशन मिळणार होते.
आरोपी व्यक्तीने यापूर्वीही केलेल्या परदेशी प्रवासाबाबत माहिती घेतली आहे. त्या आधारे पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणामागे आंतरराष्ट्रीय तस्कर गटाचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्याबाबत आरोपीची चौकशी करण्यात आली. यापूर्वी गेल्या आठवड्यातही सीमा शुल्क विभागाने अशाच प्रकारे एका प्रवाशाला अटक केली होती.
पर्यटनाच्या नावाखाली गांजा तस्करी
दक्षिण अमेरिका खंडातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची निर्मिती करण्यात येते. त्यानंतर विविध मार्गांनी जगभरात त्याचे वितरण करण्यात येते. गेल्या काही महिन्यांपासून बँकॉक मार्गे मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातून थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे जाणे-येणे असते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात विमानांची ये-जा असते. परिणामी, बँकॉकमार्गे भारतात गांजाची तस्करी करण्यात येत आहे. ६ महिन्यात १०० कोटींहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या तस्करीत थायलंडमधील भारतीय तस्करांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे.