मुंबई : जगातील सर्वात व्यस्त एकल – धावपट्टी विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (सीएसएमआयए) धावपट्ट्या पावसाळ्यानंतरच्या देखभाली-दुरुस्तीसाठी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पायाभूत सुविधांची उभारणी, सुरक्षा, विमानाचे उड्डाण – आगमन योग्यरित्या व्हावे यासाठी या काळात दोन्ही धावपट्ट्या तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार आहेत. धावपट्टी, लगतच्या दिव्यांची दुरूस्ती, एरोनॉटिकल ग्राउंड दिव्यांमध्ये बदल आदी प्रमुख कामे या कालावधीत करण्यात येणार आहेत. तसेच या विमानतळावरील धावपट्ट्यांची देखभाल-दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत. विमानतळावरील धावपट्टीची झीज होते. त्यामुळे त्यांची तपासणी करण्यात येते. तसेच योग्य ती कार्यवाही करून धावपट्टी सुरक्षित करण्यात येते. संपूर्ण देखभाल प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सहा तासांच्या आत देखभाल-दुरूस्तीचे कामे पूर्ण करण्यात येणार आहेत, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ १,९०० एकरावर विस्तारले आहे. मुंबई विमानतळ प्रवासी वाहतुकीच्या बाबतीत भारतातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून ओळखले जाते. या विमानतळावरून २०२४-२५ या वर्षात ५.५१ कोटी प्रवाशांचे व्यवस्थापन करण्यात आले. जगातील सर्वात व्यस्त एकल धावपट्टीचे हे विमानतळ असून, एकमेकांना छेदणाऱ्या धावपट्ट्या आहेत. एकमेकांना छेदणाऱ्या धावपट्ट्यांमध्ये, एका वेळी फक्त एकच धावपट्टी वापरली जाते. कारण दोन धावपट्ट्या एकाच वेळी वापरल्यास अपघात होऊ शकतो. वाऱ्याच्या दिशेनुसार धावपट्टीचा वापर करण्यात येतो. मुंबई विमानतळावरून दररोज सुमारे एक हजार विमानाचे उड्डाण – आगमन होते. तसेच मुंबई विमानतळ हे भारतातील सर्वात मोठ्या एअर कार्गो टर्मिनलपैकी एक आहे. मुंबई विमानतळावर दरवर्षी ८.५० लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त एअर कार्गोचे व्यवस्थापन करण्यात येते.

मुंबई विमानतळ प्रशासनाने सहा महिने आधीच विमान कंपन्या आणि विमान वाहतूक प्राधिकरणांना धावपट्टीच्या देखभाल – दुरुस्तीच्या कामाच्या नियोजनाची माहिती दिली जाते. त्यानुसार विमानाच्या वेळापत्रकाचे नियोजित वेळापत्रक तयार केले. त्यामुळे कोणत्याही विमान उड्डाणावर आणि आगमनावर परिणाम होणार नाही. यातून मुंबई विमानतळ प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला आहे.