मुंबईः अमेरिकन डॉलर्स स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीला गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींनी अशा प्रकार अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. आरोपींनी गुन्ह्यांत वापरलेले साहित्य व रोख रक्कम असा एक लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
रईस अहमद अब्दुल जब्बार सय्यद, अबिदूर रेहमान मोहुउद्दीन शहा, अफजलअली रिसायतअली सय्यद आणि आदिल साहिल खान अशी अटक आरोपींची नावे आहेत. मानखुर्द येथील टी जंक्शन परिसरातील लॉजमध्ये अमेरिकेतील चलन स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी लॉजवर छापा टाकून चार संशयीतांना ताब्यात घेतले. या आरोपींकडून पोलिसांनी नोटांच्या आकाराचे ४२ हून अधिक बंडलसह इतर साहित्य जप्त केले. ही टोळी अनेकांना कमी किंमतीत डॉलर देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घ्यायचे व त्यांना कागदी बंडल देऊन पलायन करीत होती.
कशी फसवणूक करायचे
आरोपी खऱ्या अमेरिकन डॉलर्सच्या नोटांना काळा रंग लावायचे. त्यानंतर त्या नोटा रसायनात बुडवायचे. त्यावरील काळा रंग गेल्यानंतर नोटा दिसायच्या. उर्वरित बंडनमध्येही अशाच प्रकारे अमेरिकन डॉलर्स असल्याचे ते भासवायचे. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी डॉलर्सवर काळा रंग लावण्यात आल्याचे भासवायचे. त्यानंतर काळा रंगाच्या कागदाचे बंडल देऊन आरोपी पैसे घेऊन पसार व्हायचे. अशा प्रकारे आरोपींनी अनेकांची फसवणूक केली आहे. आरोपींकडून डॉलरच्या आकाराच्या काळ्या रंगाच्या कागदाचे ४२ बंडल, रासायनिक द्रव्याचे चार कॅन, एक बाटली, विविध कंपन्याचे वापरते सहा मोबाइल, ३० हजार ६०० रुपयांची रोकड असा सव्वालाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सर्व आरोपी सराईत असून गेल्या अनेक वर्षांपासून ते फसवणूक करीत आहेत. आरोपी शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत असून त्यांच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई व मिरा-भाईंदर परिसरातरही आरोपींनी अशा प्रकारे फसवणूक केल्याचा संशय आहे. आरोपींनी फसवणूक केलेले अनेक तक्रारदार तक्रार देण्यासाठी पुढेच आलेले नाहीत. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष-६ चे पोलीस अधिक तपास करीत आहेत.