मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी ‘हाथ की सफाई’ करत शेकडो मोबाइल लंपास केले. याप्रकरणी काळाचौकी आणि डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली आहे. किमान तीनशेहून अधिक मोबइल लंपास झाल्याची शक्यता आहे. पोलिसांनी सोमवारी सकाळपर्यंत २० गुन्हे दाखल केले होते, तर दीडशे मोबाइल गहाळ झाल्याची नोंद करण्यात आली होती. ही संख्या वाढणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सणासुदीच्या काळात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल आणि सोनसाखळी चोरणारे चोर सक्रिय होतात. अशा चोरांना ‘फेस्टीवल चोर’ असे म्हणतात. गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकीत झालेल्या गर्दीत या चोरांनी ६४ मोबाइल चोरले होते. तेव्हा भोईवाडा आणि काळाचौकी पोलीस ठाण्यात मोबाइल चोरीचे तब्बल २० गुन्हे दाखल झाले होेते. गिरगाव चौपाटीवर शनिवार आणि रविवारी विसर्जनासाठी गर्दी झाली होती. लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीतही हजारोंची गर्दी झाली होती. या गर्दीत शिरून चोरांनी शेकडो मोबाइल लंपास केले.
तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गर्दी
मोबाइल चोरीला गेल्याने भाविक हवालदिल झाले आहे. याबाबत तक्रार देण्यासाठी भाविकांनी शनिवार पासून काळाचौकी आणि दादासाहेब भडक मार्ग (डी. बी. मार्ग) पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. तक्राररदार सोमवारीही पोलीस ठाण्यात येत होते. सध्या काळाचौकी पोलिसांनी २० पेक्षा अधिक मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. किमान साडेतीनशे ते चारशे मोबाइल गहाळ झाल्याची शक्यता आहे. काहींचे मोबाइल चोरीला गेले आहेत, तर अनेकांचे मोबाइल गहाळ झाले आहेत. मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल करणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आठ मोबाइल चोर आणि सहा सोनसाखळी चोरांना अटक
विसर्जन मिरवणुकीत चोर मोबाइल लंपास करण्यात यशस्वी ठरत होते, तर दुसरीकडे काही जणांचे प्रयत्नही फसले. गर्दीमध्ये मोबाइल चोरणाऱ्या आठ जणांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या गर्दीत सोनसाखळी चोरण्याच्या घटना घडल्या. त्यात ६ जणांना घटनास्थळावरून अटक करण्यात आल्याची माहिती काळाचौकी पोलिसांनी दिली.
रेल्वे परिसरातही मोबाइल चोरी
रेल्वे परिसरातही मोबाइल चोरीच्या घटना घडल्या आहेत. रेल्वे पोलिसांनी विसर्जनादरम्यान बंदोबस्त ठेवला होता. रेल्वे पोलिसांना गर्दीत गहाळ झालेले पाच मोबाइल आढळले. त्या मोबाइलधारकांशी संपर्क साधून त्यांना ते परत करण्यात आले. चिंचपोकळी रेल्वे स्थानकात गर्दीत मोबाइल चोरणाऱ्या एका आऱोपीला रंगेहाथ पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.