मुंबई : पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे रविवारी भक्तीभावाने विसर्जन झाले. ३१ ऑगस्ट दुपारी १२ ते १ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत सुमारे ४० हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात १ हजार सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचा, तर अन्य घरगुती गणेशमूर्तींचा मावेश होता.न्यायालयाने यंदा ६ फुटांखालील गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक केले आहे. तर, ६ फुटांवरील मूर्तींची नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन करण्याची मुभा दिली आहे.
पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचेही नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन करण्याची मागणी भाविकांकडून केली जात होती. मात्र, ती मागणी मान्य झाली नाही. दीड दिवसांच्या सुमारे ६० हजार गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचेही विसर्जन कृत्रिम तलावातच करावे लागल्याने गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनतर पाच दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मात्र, पाच दिवसांच्या विसर्जनातही भाविकांना कृत्रिम तलावातच मूर्तींचे विसर्जन करावे लागले. पाच दिवसांच्या एकूण ४० हजार २२५ मूर्तींचे विसर्जन झाले. त्यात १ हजार १७५ सार्वजनिक, तर ३९०३७ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश होता. तसेच, १३ हरतालिकांचेही विसर्जन करण्यात आले. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना विसर्जनावेळी घडली नसल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.