मुंबई : दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.ची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी पार पडली. भर पावसाताही कामगारांनी प्रचंड प्रतिसाद दिला व तब्बल ८३ टक्के मतदान झाले. ही निवडणूक ठाकरे बंधू आणि भाजप यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिका निवडणूकीची रंगीत तालीमच समजली जाते आहे.

बेस्ट कामगारांच्या पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी पार पडली. या निवडणुकीत ज्या पॅनलची सत्ता येते त्या कामगार संघटना बेस्ट उपक्रमात बलवान समजल्या जातात. त्यामुळे या निवडणूकीला महत्व आहे. मुंबई महापालिका निवडणूकीच्या तोंडावर या निवडणूकीला खूप महत्व निर्माण झाले आहे. शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले व दोन्हीकडच्या उमेदवारांचे एकच उत्कर्ष पॅनेल या निवडणुकीसाठी उतरवण्यात आले होते. त्यांना आव्हान देण्यासाठी आमदार प्रविण दरेकर व प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना यांनीही आपले पॅनल उभे केले होते. निवडणूक प्रचार जसा रंगात आला तशी ही निवडणूक ठाकरे बंधू विरुद्ध प्रसाद लाड अशीच झाली.

सोमवारी सकाळी ९ ते ५ ही मतदानाची वेळ होती. मात्र सोमवारी पावसामुळे मतदानावर परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे मतदानाची वेळ संध्याकाळी साडे सहापर्यंत वाढवण्यात आली होती. तब्बल ८३ टक्के सभासदांनी मतदान केले. भरघोस मतदान झाल्यामुळे आताच्या बेस्ट कामगार सेनेच्या पॅनलला धोका असल्याची चर्चा आहे.

आज मतमोजणी बेस्ट उपक्रमाची सर्व आगरे आणि बेस्टची कार्यालये अशा ३५ केंद्रावर ही निवडणूक पार पडली. पतपेढीच्या १५,१२३ सभासदांपैकी १२,६५६ सभासदांनी मतदान केले. मंगळवारी वडाळा आगारात मतमोजणी होणार आहे.

आरोपांनी गाजला प्रचार….

आमदार प्रसाद लाड हे या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते. शिवसेनेने (ठाकरे)देखील आपली सगळी यंत्रणा, विभागप्रमुख, नगरसेवक कामाला लावले होते. निवडणुकीच्या आधीच संचालक मंडळाला आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावल्यामुळे आधीच ठाकरे यांचे पॅनल वादात सापडले होते. लाड यांच्या श्रमिक उत्कर्ष सभा पॅनलने पैशाची पाकिटे वाटल्याचा आरोप मनसेचे संदीप देशपांडे यांनी केला होता.

कोणाला होणार फायदा

या निवडणुकीत प्रसाद लाड यांचे जसे पॅनल होते तसेच माजी नगरसेवक सुनील गणचार्य यांचे भाजप कामगार संघांचेही पॅनल होते आणि कामगार नेते शशांक राव यांचेही पॅनल होते. राव हे सध्या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे भाजपची मते विभागली जातील अशीही चर्चा आहे. तर ठाकरे बंधुंच्या युतीचा किती फायदा होईल ते यानिमित्ताने समोर येणार आहेच. पण अत्यंत कमी सभासद असलेल्या मनसेसाठी ही निवडणूक फायद्याची ठरणार आहे.