मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जातात. या इमारतीची भव्यता आणि सौंदर्य देश विदेशातील पर्यटकांनीही भुरळ घालते. जानेवारी २०२१ ते जुलै २०२५ या साडेचार वर्षांत मुंबईकरांसह देश – विदेशातील मिळून सुमारे २० हजार पर्यटकांनी महानगरपालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूची सहल केली आहे. दर शनिवार आणि रविवारी ३५० रुपये शुल्क भरून या पुरातन वारसा इमारतीला भेट देता येते.

इंडो सार्सानिक’ स्थापत्य शैलीतील भव्य इमारत

मुंबईत अनेक ऐतिहासिक वास्तू आणि स्थळे असून त्यात बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीचाही समावेश होतो. इंडो सार्सानिक’ स्थापत्य शैलीतील या भव्य इमारतीतून महानगरपालिका प्रशासन मुंबईकरांना नागरी सुविधा पुरविते. महानगरपालिका इमारतीच्या बांधकामास २५ एप्रिल १८८९ रोजी सुरुवात झाली. तत्कालीन मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मिळालेल्या ६६००.६५ चौरस वार जमिनीवर ही इमारत बांधण्यात आली. महानगरपालिका मुख्यालय इमारतीचे संकल्पचित्र तत्कालीन प्रख्यात वास्तुशास्त्रज्ञ एस. डब्ल्यू. स्टिव्हन्स यांनी तयार केले होते. ३१ जुलै १८९३ रोजी या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. त्यावेळी थॉमस ब्लॅनी हे अध्यक्ष होते, तर हॅरी ए. अॅक्वर्थ हे आयुक्त होते.

बांधकामासाठी ११,१९,९६९ रुपये खर्च

या इमारतीसाठी ११,८८,०८२ रुपये एवढ्या खर्चास मान्यता देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात ११,१९,९६९ रुपये एवढाच खर्च झाला. बांधकामाशी संबंधित असणारे कंत्राटदार, कारागीर व अभियंते यांनी अंदाजापेक्षा कमी कालावधीत व कमी खर्चात इमारत पूर्ण केली होती. दीडशे वर्षांपूर्वी म्हणजेच ४ सप्टेंबर १८७३ रोजी महानगरपालिकेची पहिली सभा झाली. त्यानंतर सध्या अस्तित्वात असलेल्या मुख्य इमारतीमध्ये १६ जानेवारी १८९३ रोजी प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दर शनिवार, रविवारी सहा सहलींचे आयोजन

महानगरपालिका मुख्यालयाची ऐतिहासिक वास्तू नागरिकांना तसेच पर्यटकांना पाहता यावी, यासाठी मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि खाकी टूर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने दर शनिवारी, रविवारी मुंबई महानगरपालिका मुख्यालय पुरातन वारसा दर्शन सहलीचे आयोजन केले जाते. त्यात दर शनिवार-रविवारी मिळून एकूण ६ सहली आयोजित केल्या जातात. रविवार २० हजार पर्यटकांचा टप्पा या सहलीने गाठला. ३५० रुपये शुल्क भरून नोंदणी करता येते, अशी माहिती सहल संयोजक भरत गोठोसकर यांनी दिली आहे