मुंबई : कबुतरखान्यांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य पुरवण्याबाबत मुंबई महापालिकेकडे दादर कबुतरखाना ट्रस्ट बोर्ड, यास्मिन भन्साळी अँड कंपनी आणि ॲनिमल अँड बर्डस् राईटस् ॲक्टिविस्ट या तीन संस्थांचे अर्ज आले आहेत. या तीन संस्थांच्या अर्जावर मुंबई महापालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. या सर्व अर्जांमध्ये दादर कबुतरखाना ट्रस्टने कबुतरांना खाद्य पुरवण्याबाबतच्या सर्व जबाबदाऱ्यांचे पालन करण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, मुंबई कॉंग्रेसकडून आलेला अर्ज महापालिका प्रशासनाने विचारात घेतला नसल्याचा आरोप कॉंग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून मोठा वाद झाला असून हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या विषयावरून वातावरणही चांगलेच तापले आहे. तसेच जैन समाजात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. अखेर पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्यात यावे व कबुतरखाना बंद करू नये असे निर्देश राज्य सरकारने ७ ऑगस्टला दिले होते. मुंबई महापालिकेने कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केल्यानंतर काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर १३ ऑगस्टला झालेल्या सुनावणीच्या वेळी कबुतरांना खाद्य घालण्यावरील बंदीचा मुंबई महापालिकेचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला. मात्र दादर येथील कबुतरखान्याजवळ कबुतरांना दररोज सकाळी सहा ते आठ या कालावधीत खाद्य देण्याच्या मागणीचा विचार सुरू असल्याची माहिती महापालिकेने उच्च न्यायालयात दिली. त्यावेळी महापालिकेने कोणतीही परवानगी देण्यापूर्वी आधी त्याबाबत जाहीर सूचना काढावी आणि प्रस्तावावर हरकती-सूचना मागवाव्यात. त्यानंतर, कबुतरांना सकाळी दोन तास खाद्य देण्याचा निर्णय घ्यावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने आता कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य घालण्याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. हरकती व सूचना मागवण्याची अंतिम मुदत २९ ऑगस्ट आहे.
महापालिकेकडे तीन अर्जमुंबईतील कबुतरखान्यांबाबत मुंबई महानगरपालिकेला दादर कबुतरखाना ट्रस्ट बोर्ड, यास्मिन भन्साळी अँड कंपनी आणि श्रीमती पल्लवी पाटील, ॲनिमल अँड बर्डस् राईटस् ऍक्टिविस्ट यांच्याकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. याबाबत आलेल्या तीन अर्जांवर मुंबई महापालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. हे तिनही अर्ज मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?guest_user-english या लिंकवर अवलोकनासाठी उपलब्ध आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत.
काँग्रेसचा आरोप
मुंबई कॉंग्रेसचे महासचिव माजी नगरसेवक पूरण दोषी यांनीही मुंबई महापालिकेकडे कबुतरांना खाद्य देण्याबाबत अर्ज केला होता. मात्र त्यांच्या अर्जाची दखल न घेतल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबई महापालिकेकडे नक्की किती अर्ज आले होते ते प्रशासनाने जाहीर करावे. तसेच त्यांनी निवडक तीनच अर्ज का दाखवले असाही सवाल दोषी यांनी केला आहे. हा मोठा घोटाळा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
१) कबुतरखाना ट्रस्टने आपल्या अर्जात सकाळी ७.०० ते ९.००, दुपारी १२.०० ते १.००, संध्याकाळी ४.०० ते ५.०० या वेळेत कबुतरांना खाद्य देण्याची मागणी केली आहे. फक्त स्वच्छ व कोरडे धान्य वापरले जाईल. ठरावीक प्रमाणातच अन्न दिले जाईल; उरलेले धान्य राहू दिले जाणार नाही, असे या अर्जात म्हटले आहे. अन्नदानानंतर त्वरित परिसराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जाईल. कबुतरांचे विष्ठा, पिसे इ. योग्य प्रकारे टाकण्याची जबाबदारी ट्रस्ट घेईल. पाणी व नाल्यांची स्वच्छता कायम ठेवली जाईल. अनधिकृत लोकांनी धान्य टाकू नये यासाठी कुंपण व सूचना फलक लावले जातील. कबुतरांचे जीवन या सामूहिक खुराकावर अवलंबून आहे. अन्नपुरवठा थांबल्यामुळे कबूतरांचा मृत्यू होत असल्याचे नमूद करून त्याची छायाचित्रेही सादर केली आहेत.
२) पल्लवी सचिन पाटील (पक्षी व प्राणी हक्क कार्यकर्त्या) यांच्या अर्जात कबुतरांना खाद्य-पाणी देण्याची परवानगी, त्यासाठी आवश्यक सुविधा व स्वच्छतेची जबाबदारी मनपाने घ्यावी अशी मागणी केली आहे. कबूतरखाना व इतर विद्यमान ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्याची परवानगी द्यावी. खाद्य देणाऱ्यांना (विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिला) सुलभ प्रवेश मिळावा. कबुतरांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. या ठिकाणी स्वच्छतेची नियमित व्यवस्था ठेवावी (आठवड्यातून किमान ३ वेळा), खाद्य देणाऱ्यांना छळ किंवा अडथळा होऊ नये यासाठी स्पष्ट जनजागृती व सूचना फलक बसवावे. जोपर्यंत तज्ज्ञ समितीचा अंतिम अहवाल येत नाही, तोपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, आदी मागण्या पाटील यांनी केल्या आहेत.
३) तिसरा अर्ज पर्यावरण व प्राणीस्नेही. निरव कुमार दवे यांनी सादर केला आहे. त्यांनी महालक्ष्मी रेस कोर्सच्या हिरवळीवर कबुतरांना खाद्य देण्यास केलेली बंदी उठवण्याची मागणी केली आहे.
येथे हरकती व सूचना पाठवाव्या
नागरिकांनी संकेतस्थळावर दिलेल्या या अर्जांचे अवलोकन करून कबुतरखान्यांच्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीने व ठराविक वेळेतच कबुतरांना खाद्य पुरवावे (Control Feeding) किंवा कसे, तसेच यातील अन्य मुद्द्यांबाबत त्यांच्या हरकती / सूचना suggestions@mcgm.gov.in या ई-मेल आयडीवर २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. तसेच, हरकती / सूचना लेखी स्वरुपात प्रत्यक्ष सादर करावयाच्या असतील तर त्या कार्यकारी आरोग्य अधिकारी, तिसरा मजला, एफ दक्षिण विभाग कार्यालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई-४०० ०१२ येथे शुक्रवार २९ ऑगस्टपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात, असे प्रशासनाने केले आहे.