मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, आपत्ती उद्भवू नये यासाठी कशी खबरदारी घ्यावी, आपत्ती उद्भवलीच तर आपत्कालीन व्यवस्थापन कसे करावे, याबाबत महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून गणेशोत्सव मंडळातील स्वयंसेवकांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. यंदाचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक मूर्तींच्या नियमांमुळे व न्यायालयीन निकालांमुळे आधीच चर्चेत आहे. गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन व कार्यवाही सुरू केली आहे. मुंबईत सुमारे दहा हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत.
मुंबईतील गणेशोत्सव महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. लाखो भाविक, पर्यटक या उत्सवासाठी मुंबईत येतात. विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी देशभरातून भाविक मुंबईत येत असतात. त्यामुळे मंडळांच्या उत्सवस्थळी, परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. अशा वेळी गर्दीचे नियोजन कसे करावे, दुर्घटना घडू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, प्रसाद वाटप करताना कोणती दक्षता घ्यावी, आपत्कालीन कार्यवाही कोणती व कशी असावी याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रत्येक गणेशशोत्सव मंडळातील दोन स्वयंसेवकांना हे एकदिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. आपत्कालीन व्यवस्थापनात नागरी सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. या उपक्रमासाठी प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालयाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी समन्वय साधण्यात येणार आहे.
विभाग कार्यालयाकडून प्राप्त झालेली सार्वजनिक मंडळांची यादी उप आयुक्त (परिमंडळ २) आणि गणेशोत्सव समन्वयक यांच्यामार्फत आपत्कालीन व्यवस्थापन विभागास उपलब्ध करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना द्यावयाच्या एकदिवसीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सहायक प्रमुख अधिकारी राजेंद्र लोखंडे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विकास कांबळे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
स्वयंसेवकांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात आपत्ती म्हणजे काय, धोक्याची ओळख, जोखमीचे व्यवस्थापन, आपत्तीत काय करावे, काय करू नये, अग्निशमनाची प्रात्यक्षिके, प्रथमोपचार कसा करावा, गर्दीवर नियंत्रण कसे राखावे आदींबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात मुंबई महानगरपालिका अधिकारी, मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलिस अधिकारी, महानगरपालिका रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.