मुंबई : मुंबई तसेच उपनगरांत पावासाने जोर धरलेला आहे. बुधवारपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू झाली आहे. दरम्यान, मुंबईत शनिवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबई तसेच उपनगरांत आज पहाटेपासून पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान , आज मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस कोकण, पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई, ठाणे भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…ही तर न्यायाची थट्टा! दंडाची रक्कम न भरल्याने अतिरिक्त शिक्षा भोगणाऱ्या आरोपीची तात्काळ सुटका करा, उच्च न्यायालयाचे आदेश

राज्याच्या मध्य भागात परस्परविरोधी वाहणाऱ्या पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र तयार झाले आहे. तसेच गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कायम असून पाऊस अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईसह इतर काही भागात देखील मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रायगड , रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.