scorecardresearch

मुंबईतील इमारत दुर्घटना: एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार स्थानिक बंडखोर आमदाराने थेट गुवाहाटीतून जाहीर केली मोठी आर्थिक मदत

कुर्ला पूर्वमधील नाईक नगर सोसायटीची एक विंग सोमवारी मध्यरात्री ११.४५ च्या सुमारास कोसळली

Mumbai Building Collapse
व्हिडीओ शेअर करत दिली मदतीसंदर्भातील माहिती (दुर्घटनेचा फोटो- गणेश शिर्सेकर )

कुर्ला पूर्व परिसरातील एस. जी. बर्वे मार्गावरील एसटी स्थानकाच्या मागे असलेल्या नाईक नगर सोसायटीची एक विंग सोमवारी मध्यरात्री कोसळली असून यामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याच दुर्घटनेमध्ये अडकलेल्या कुटुंबियांना आणि मृतांच्या नातेवाईकांना स्थानिक आमदार आमदार मंगेश कुडाळकर यांनी थेट गुवहाटीमधून मदत जाहीर केलीय. कुडाळकर हे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपैकी एक असून आपण एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार ही मदत जाहीर करत असल्याचं त्यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “शिवसेनेचे बंडखोर आमदार दलित आणि वंचितविरोधी, ते हिंदूत्वही मानत नाहीत कारण, कारण तसं असतं तर…”

“नाईक नगर सोसायटीची इमारत कोसळळ्याची दुर्देवी घटना रात्री घडली. यामध्ये चार जण मरण पावलेले आहेत. १० ते १२ कुटुंबं त्या ठिकाणी राहत होती,” अशी माहिती कुडाळकर यांनी व्हिडीओमध्ये दिली आहे. तसेच पुढे बोलताना, “या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. ढीगाऱ्याखाली ९ ते १० जण अडकल्याची शक्यात आहे,” असंही म्हटलंय.

“या दुर्घटनेमध्ये सापडलेल्या सर्व कुटुंबांना प्रत्येकी १ लाख रुपये आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मी देत आहे,” अशी घोषणा मदत जाहीर करताना कुडाळकर यांनी केलीय. त्याचप्रमाणे पुढे बोलताना कुडाळकर यांनी, “मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे ढीगाऱ्याखाली आहेत ते सुखरुप बाहेर यावेत अशी देवा चरणी प्रार्थना करतो,” असं म्हणत आपल्या सहवेदना व्यक्त केल्यात.

नक्की वाचा >> “पूरग्रस्त गुवाहाटीत लोकांना अन्न मिळत नसताना बंडखोर आमदारांचा दिवसाचा जेवणाचा खर्च…”; आदित्य ठाकरेंनी सांगितला बिलाचा आकडा

या दुर्घटनेत ११ जण जखमी झाले, तर तिघांचा मृत्यू झाला. जखमींपैकी एकाला राजावाडी, तर अन्य एकाला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. राजावाडी रुग्णालयात नऊ जखमींवर उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नक्की वाचा >> बंडखोर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपाची तयारी?; फडणवीसांच्या घरी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या भूखंडावर उभ्या असलेल्या नाईक नगर सोसायटीची एक विंग सोमवारी मध्यरात्री ११.४५ च्या सुमारास कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत रहिवाशांची सुखरुप सुटका केली. या दुर्घटनेत ११ जण जखमी झाले. या दुर्घटनेत अजय भोले बासफोर (२८) याच्यासह दोघांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या अन्य दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: संजय राऊतांचे बंधूही गुवाहाटीला जाणार? सुनील राऊत म्हणाले, “माझ्यासाठी आमदारकी…”

दुर्घटनेत जखमी झालेले चैत बसपाल (३६), संतोषकुमार गौड (२५), सुदेश गौड (२४), रामराज रहमानी (४०), संजय माझी (३५), आदित्य कुशवाह (१९), अबिद अन्सारी (२६), गोविंद भारती (३२), मुकेश मोर्य (२५), मनिष यादव (२०) यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. यापैकी नऊ जखमींवर उपचार करुन घरी त्यांना पाठविण्यात आले. उर्वरित एकाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुर्घटनेतील अन्य एक जखमी अखिलेश माझी (३६) याला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजावाडी आणि शीव रुग्णालयात दाखल जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai building collapse kurla local mla mangesh kudalkar announce 5 lakh help from guwahati by order of eknath shinde scsg

ताज्या बातम्या