कुख्यात गुंड छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त मालाडमध्ये फलक लावण्याप्रकरणी कुरार पोलिसांनी शनिवारी सहा जणांवर गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आता राजनच्या वाढदिवसानिमित्त केक कापल्याप्रकरणी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. श्रीपाद दिनकर पराडकर उर्फ निलेश उर्फ अप्पा असं या व्यावसायिकाचे नाव आहे.
हेही वाचा – कथित घोटाळा प्रकरणी मुंबई आयुक्त चहल यांना ईडीचं समन्स, अनिल देशमुख म्हणाले, “मला एकच सांगायचं आहे की…”
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, १३ जानेवारी रोजी टिळक नगर येथील सहकार जंक्शनजवळ श्रीपाद दिनकर पराडकर याने छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त राजनचा फोटो असलेला केक कापला होता. या घटनेचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. पोलिसांनी या व्हिडीओ दखल घेत पराडकरला अटक केली आहे. तसेच त्याला न्यायालयत हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे. याचबरोबर पराडकचे छोटा राजनशी काय संबंध आहेत? याची चौकशीदेखील पोलिसांकडून सुरू आहे.
हेही वाचा – अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसाचे झळकले पोस्टर; फडणवीस म्हणाले, “त्यावर…”
दरम्यान, तत्पूर्वी छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त १४ आणि १५ जानेवारीला मालाड पूर्वेकडील कुरार व्हिलेज येथील तानाजी नगरमधील गणेश मैदानात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी परिसरात फलक लावण्यात आले होते. त्यावर छोटा राजनचा ‘आधारस्तंभ’ असा उल्लेख करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. याप्रकरणी कुरार पोलिसांनी कारवाई करत हे फलक तत्काळ फलक हटवले होते. तसेच, पोलिसांनी याप्रकरणातील सहा जणांना ताब्यात घेतले होते.