मुंबई : मुंबईतील ५० हून अधिक फुलपाखराप्रेमी आणि संशोधकांनी एकत्र येऊन ‘मुंबई बटरफ्लाय क्लब’ची स्थापना केली आहे. या क्लबचे उद्घाटन रविवारी ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळे गावातील प्रसिद्ध ‘ओवळेकर वाडी फुलपाखरू उद्यान’ येथे करण्यात आले.

क्लबचे संस्थापक तसेच फुलपाखरू अभ्यासक डॉ. राजू कासंबे आणि ओवळेकर वाडी फुलपाखरू उद्यानाचे राजेंद्र ओवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या क्लबची सुरुवात फुलपाखरांच्या निरीक्षण यात्रेने झाली. सहभागी सदस्यांना महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मनसह अनेक प्रजातींचे दर्शन झाले. त्यांनी फुलपाखरांची अंडी, अळ्या, कोश व अन्य कीटकांचे निरीक्षण करत आनंद घेतला.

क्लबच्या आगामी उपक्रमांविषयी माहिती देताना डॉ. कासंबे यांनी, पर्यावरण जागृतीसाठी फुलपाखरे हे उत्कृष्ट प्रतीक आहेत. या क्लबच्या माध्यमातून आम्ही फुलपाखरांवर आधारित फेऱ्या, व्याख्याने, वेबिनार आणि शिबिरे आयोजित करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, रविवारी उद्घाटनप्रसंगी क्लबमध्ये सहभागींना मार्गदर्शन करण्यासाठी के. जी. सोमय्या महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमोल पाटवर्धन, फुलपाखरू संशोधक दिवाकर ठोंबरे, फुलपाखरू व वनस्पतींचे चित्रकार आणि संशोधक परेश चुरी आणि राजेंद्र ओवळेकर यांचा समावेश होता. यावेळी सहभागी झालेल्या सदस्यांनी दर महिन्याला अशी निरीक्षण यात्रा आयोजित करण्याची कल्पना मांडली.

सर्वांनी फुलपाखरांच्या संवर्धनावर, नियमित उपक्रमांवर आणि जैवविविधतेच्या दस्तऐवजीकरणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली. याचबरोबर सर्वांनी फुलपाखरांच्या संवर्धनावर, नियमित उपक्रमांवर आणि जैवविविधतेच्या दस्तऐवजीकरणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली. दरम्यान, ‘बटरफ्लाय क्लब’मध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्याची संपूर्ण माहिती ‘मुंबईत ‘बटरफ्लाय क्लब’च्या इन्स्टाग्राम पेजवर मिळेल. तसेच क्लबमधील कार्यक्रम हे एका जागेपुरते मर्यादित न राहता मुंबईत कुठेही करण्यात येतील.

ओवळेकर वाडी फुलपाखरू उद्यानाविषयी…

एकाच वेळी विविध रंगांची, विविध आकारांची, विविध प्रजातींची फुलपाखरे पाहायची असतील तर ठाण्यातील ‘ओवळेकरवाडी फुलपाखरू उद्यन’ याशिवाय दुसरा पर्याय नाही. दोन एकरामध्ये वसलेल्या या फुलपाखरू उद्यानात असंख्य फुलपाखरे भिरभिरताना दिसतात.पण त्याशिवाय येथे मिळते फुलपाखरांच्या जगाची, त्यांच्या दैनंदिन उपक्रमाची माहिती तीही प्रात्यक्षिकासह. म्हणजे केवळ पिकनिक म्हणून नव्हे तर फुलपाखरांचा आणि पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे.

नानाविध रंगांची फुलपाखरे एकाच वेळी पाहता यावी यासाठी अशा प्रकारचे उद्यान परदेशात बनविले जाते; परंतु त्यात कृत्रिमपणा असतो. ओवळेकरांच्या बागेत मात्र नैसर्गिकपणे फुलपाखरे येतात. याचे कारण म्हणजे फुलपाखरांना आकर्षिक करण्यासाठी येथे नानाविध प्रयोग करण्यात येतात. या बागेत आल्यानंतर केवळ विविध प्रकारची फुलपाखरे पाहायला मिळत नाहीत तर त्यांची नावे, ती कोणत्या प्रकारची आहेत यांची इत्थंभूत माहिती ओवळेकरांकडून मिळते. त्यासाठी ओवळेकर आधी तासभर फुलपाखरांविषयी व्याख्यान देतात आणि त्यानंतर या बागेची सफर घडवून आणतात.