मुंबईः दोन हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची ११०० कोटी रुपयांची फसवणूक करणारा सनदी लेखापाल (सीए) अंबर दलाल विरोधात दाखल गुन्ह्यांत सक्तवसुली संचलनालयाने २२ कोटी ८६ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यात मुंबई व ठाण्यातील सदनिका व जमिनींचा समावेश आहे. याशिवाय अंबर दलाल, त्याचे कुटुंबीय आणि त्याची साथीदार रश्मी प्रसाद यांच्या विमा पॉलिसी आणि गुंतवणूक यांचाही त्यात समावेश आहे. यापूर्वी, दुबईतील रश्मी प्रसाद यांच्या मालकीच्या (सुमारे ४.९५ कोटी रुपये किंमत) एका सदनिकेवर ईडीने टाच आणली होती.

कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करून गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली आरोपीने २००९ भारतीय गुंतवणूकदारांची फसवणूक केली. त्यात ११०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. पण हे संपूर्ण प्रकरण खूप मोठे असून अमेरिका व संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथीलही अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी १५ मार्च रोजी रिट्झ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे मालक दलाल यांच्याविरुद्ध सुरुवातीला डझनभर गुंतवणूकदारांची ५४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.जुहू येथील फॅशन डिझायनर बबिता मलकानी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा : मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी तक्रारदारांची संख्या वाढली असून आतापर्यंत २००९ तक्रारदार आर्थिक गुन्हे शाखेकडे आले आहेत. आरोपींनी त्यांची एकूण ११०० कोटी रुपयांची फसवणूक केली केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या आधारावर ईडीने तपासाला सुरुवात केली आहे.आरोपीने गुन्ह्यातील ५१ कोटी रुपये स्वतःच्या बँक खात्यात वळते केले होते. त्याद्वारे भारतात व परदेशात मालमत्ता खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यासाठी हवाला नेटवर्कचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे. याबाबत ईडीही अधिक तपास करीत आहे.