मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रत्येक स्थानकात गर्दी वाढली असून, प्रवाशांसाठी प्रत्येक स्थानकावरील थांबा महत्त्वाचा आहे. परंतु, मध्य रेल्वेच्या जुळ्या स्थानकावर लोकल थांबा रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील करी रोड आणि चिंचपोकळी ही दोन्ही स्थानके एकसारखी दिसत असल्याने त्यांना जुळी स्थानके म्हणून संबोधण्यात येते. रविवारी मध्य रेल्वेवर ब्लाॅक असल्याने, या स्थानकांतील लोकल थांबा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करून करी रोड, चिंचपोकळी गाठावे लागणार आहे.
मध्य रेल्वे
मुख्य मार्ग
कुठे : सीएसएमटी – विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत
परिणाम : सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल सीएसएमटी – विद्याविहार दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील आणि विद्याविहार स्थानकापासून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर रेल्वे स्थानकातून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या लोकल विद्याविहार – सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील.
हार्बर मार्ग
कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत
परिणाम : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे डाऊन मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० दरम्यान आणि चुनाभट्टी / वांद्रे – सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान ब्लाॅक असेल. या कालावधीत लोकल सेवा रद्द असतील. सीएसएमटी येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन लोकल आणि सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ दरम्यान वांद्रे/गोरेगावला जाणाऱ्या डाऊन लोकल सेवा रद्द असतील. ब्लॉक कालावधीत पनवेल – कुर्लादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवासी ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करू शकतात.
पश्चिम रेल्वे
कुठे : बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत गोरेगाव – बोरिवली दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. त्यामुळे काही अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येतील. तर, अंधेरी – बोरिवली दरम्यान काही लोकल गोरेगाव स्थानकापर्यंत हार्बर मार्गावरून चालवण्यात येतील. ब्लाॅक कालावधीत बोरिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक १, २, ३ आणि ४ वर कोणतीही लोकल सेवा उपलब्ध नसेल.