मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला आणि पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाची तुळई अखेर रेल्वे मार्गावर बसवण्यात आली. ५५० मेट्रिक टन वजनाची उत्‍तर बाजूची तुळई (गर्डर) रेल्‍वे भागात सरकविण्‍याची कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण झाली. आता पुलाची उर्वरित कामे हाती घेण्यात येणार असून पूल जूनपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक बनल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. या प्रकल्पांतर्गत पुलाची एक तुळई आतापर्यंत बसवण्यात आली. तर दुसरी तुळई बसवण्याचे काम आता हाती घेण्यात आले होते. त्याकरिता २६ रविवारी २०२५ रोजी मध्य रेल्वेवर ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र तुळई सरकवण्याची कार्यवाही पूर्ण होण्यास १२ मीटर अंतर शिल्‍लक असताना काही तांत्रिक अडचणींमुळे व्यत्यय आला होता. महानगरपालिका आणि मध्य रेल्वे प्रशासनाने समन्वय साधून, तांत्रिक अडचणींवर मात करत तुळई सरकविण्याचे काम अखेर शुक्रवारी पूर्ण केले.

मध्‍य रेल्‍वे प्रशासनाने गुरुवार, ३० जानेवारी रोजी मध्यरात्री १.३० ते शुक्रवार, ३१ जानेवारी रोजी पहाटे ४.०० या अडीच तासांच्‍या कालावधीत वाहतूक व वीजपुरवठा या दोन्‍ही घटकांमध्‍ये घेतलेल्या विशेष खंड (स्पेशल ब्‍लॉक) दरम्‍यान तुळई सरकविण्‍याचे आव्‍हानात्‍मक काम पूर्ण करण्‍यात आले.

तुळई सरकविण्याचे हे काम तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक होते. त्यासाठी विशेष तज्ञ मे राईट्स यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार व मध्य रेल्वेच्या निर्देशाप्रमाणे मेसर्स राईट्स लिमिटेड यांच्या तांत्रिक पर्यवेक्षणाखाली हे काम पूर्ण करण्यात आले. आता, मध्‍य रेल्‍वेने ‘ब्‍लॉक’ घेतल्‍यानंतर लोखंडी तुळई स्‍थापित करण्‍याची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे.

रेल्‍वे मार्गावर तुळई स्‍थापित करण्‍याची कार्यवाही पूर्ण झाल्‍यानंतर पुढील कामाचे सूक्ष्‍म नियोजन करून टप्‍पानिहाय किती कालावधी लागेल, याची निश्चिती महानगरपालिकेच्‍या पूल विभागामार्फत करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार, पूर्व आणि पश्चिम दिशेच्‍या पोहोच मार्गासाठी (ऍप्रोच रोड) खांब पाया बांधणी (पाईल फौंडेशन) पूर्ण करणे, पोहोच रस्‍त्‍यांचे काँक्रिटीकरण आणि भार चाचणी (लोड टेस्‍ट) करणे आदी कामांचे वेळापत्रक तयार करण्‍यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नियोजित वेळापत्रकानुसार, अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्‍यास जून २०२५ पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीस खुला करण्‍यासाठी महानगरपालिका प्रयत्‍नशील आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्‍यानंतर ॲण्‍टी क्रॅश बॅरिअर्स, वीजेचे खांब उभारण्‍याकामी होणारा कालापव्‍यय टाळण्‍यासाठी ही कामे समांतरपणे पूर्ण केली जाणार आहेत.