मुंबई : कॅटरिंग व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी कुख्यात गुंड चेंबूर अण्णासह दोघांना अटक केली. खंडणीची रक्कम न दिल्यामुळे आरोपींनी तक्रारदाराला मारहाण केली असून त्यात तक्रारदार गंभीर जखमी झाले. मुख्य आरोपी अजय मारीमुत्तु पेरिस्वामी ऊर्फ चेंबूर अण्णाविरोधात २२ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात खंडणी व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३७ वर्षीय तक्रारदाराचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चेंबूर अण्णा तक्रारदाराला धमकावत होता. पण त्याने दुर्लक्ष केले. तक्रारादार सोमवारी वाशी नाका परिसरातील आदर्श नगर येथील घरात झोपले होते. त्यावेळी चेंबूर अण्णा, त्याचा साथीदार राहिल अमीद सय्यद (२८) व अन्य एका आरोपीने तक्रारदाराच्या घराच्या दरवाज्यावर लाथा मारण्यास सुरूवात केली. त्यानंतर आरोपी जबरदस्तीने तक्रारदाराच्या घरात शिरले. त्यांनी तक्रारदाराला खंडणीसाठी धमकावले. तक्रारदारांनी खंडणी देण्यास नकार देताच चेंबूर अण्णाने त्यांच्या डोक्यात बांबूने प्रहार केला. इतर दोन आरोपींनीही तक्रारदाराला लाथा-बुक्क्याने मारहाण केली. तसेच खंडणी दिली नाही, तर ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ याप्रकरणी भारतीय न्याय संहिता ११८ (१), ११५ (२), ३३१ (६), ३०८ (५) व ३ (५)अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस पथकाने चेंबूर अण्णा व त्याचा साथीदार राहिल अमीद सय्यदला अटक केली. दोन आरोपींसह त्यांच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.
आरोपी चेंबूर अण्णाविरोधात यापूर्वी हत्येचा प्रयत्न, मारहाण, खंडणी, धमकावणे आदी प्रकरणी २२ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय राहिल सय्यदविरोधात चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोघांविरोधात यापूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आरोपीने हल्ल्यात वापरलेला लाकडी बांबू पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलीस अधिक तपास करीत आहेत.