अंबरनाथजवळ रुळाला तडा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

साडे आठनंतर रेल्वेसेवा पूर्ववत

मध्य रेल्वेवरील प्रवाशांना शुक्रवारी ऐन गर्दीच्या वेळी मनस्तापाचा सामना करावा लागला. अंबरनाथजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने बदलापूर- कल्याण मार्गावरील वाहतूक ठप्प होती. साडे आठनंतर रेल्वेसेवा पूर्ववत झाली असली तरी या मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत.

शुक्रवारी सकाळी बदलापूर- अंबरनाथ दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला. याचा फटका मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्या आणि एक्स्प्रेस गाड्यांना बसला. ऐन गर्दीच्या वेळी कर्जत- बदलापूरवरुन मुंबई सीएसटीएमकडे येणाऱ्या गाड्या खोळंबल्या. सकाळी सव्वा आठच्या सुमारास दुरुस्ती काम पूर्ण झाल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकारामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा एकदा कोलमडले. गेल्या तीन वर्षांत मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर रुळांना तडे जाण्याच्या वा तुटण्याच्या ५२० घटना घडल्याचे माहिती अधिकारातून उघड झाली होती. यामध्ये मध्य रेल्वेवरील बिघाडाची संख्या जास्त असून प्रत्येक घटनेनंतर वाहतूक विस्कळीत झाल्याचे समोर येत आहे.

पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय लोकल सेवा चर्चगेट ते डहाणू आणि मध्य रेल्वेचा पसारा सीएसएमटी ते कर्जत, खोपोली, कसारा आणि हार्बर पनवेल आणि अंधेरीपर्यंत आहे. या मार्गावरून दररोज ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. आधीच वाढत जाणारी प्रवासी संख्या आणि त्यातच रेल्वे मार्गावर होणाऱ्या गुन्हेगारी घटना यामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. गेल्या काही वर्षांत रुळाला तडा जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे लोकल गाडय़ा विस्कळीत होतानाच अपघातांचाही धोका संभवतो. २०१४ पासून ऑक्टोबर २०१७ पर्यंत तब्बल ५२० वेळा रूळ आणि वेल्ड तुटण्याच्या घटना पश्चिम तसेच मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावर घडल्याची माहिती नुकतीच समोर आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai central railway local service disrupted due to track fracture between ambarnath badlapur