मुंबई : ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणा-या बेलासिस उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीला वेग आला आहे. रेल्वेच्या हद्दीतील काम पश्चिम रेल्वे करीत असून १२ तुळया स्थापन करण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. बेलासिस पूल करण्यासाठी ३१ डिसेंबरचे उद्दीष्ट्य ठरवण्यात आले आहे. त्यामुळे नियोजित पद्धतीने कामे पूर्ण झाल्यास या वर्षाच्याअखेरीस हा पूल वाहतूकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
मुंबईत एकाचवेळी रेल्वे मार्गावरील अनेक पूलांची कामे सुरू आहेत. त्यापैकी बहुतांशी पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. अंधेरीचा गोखले पूल, विक्रोळीचा पूल, सिंदूर पूलही ( आधीचा कर्नाक पूल) सुरू झाला आहे. आता मुंबई महापालिकेने बेलासिस पुलावर लक्ष केंद्रित केले आहे. तब्बल १३० वर्षे जुना बेलासिस पूल पाडून त्याची पुनर्बांधणी केली जात आहे. पुलाचे रेल्वे हद्दीतील काम पश्चिम रेल्वे करत असून पुलाच्या पोहोच रस्त्याची उभारणी बृहन्मुंबई महानगरपालिका करत आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात रेल्वे कंत्राटदाराने ३६ मीटर स्पॅनच्या एकूण १२ तुळया स्थापित (गर्डर लॉचिंग) करण्याची कार्यवाही नुकतीच पूर्ण केली आहे.
आता, रेल्वे प्राधिकरणाने तुळयाचे मजबुतीकरण, पुलाच्या प्रवास पृष्ठभागाची रचना करणे, स्लॅब कास्टिंग इत्यादी कामे हाती घेतली आहे. यासाठी वाहतूक व वीज पुरवठा या दोन्ही घटकांमध्ये ४० खंड (ब्लॉक) घेतले जाणार आहेत. बेलासिस पुलाचे बांधकाम ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट्य आहे.
केबल आधारित पूल…
मुंबई सेंट्रल स्थानकानजीक रेल्वे मार्गावर केबल आधारित पूल उभारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (महारेल) यांच्याशी करार केला आहे. बेलासिस पूल प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी एप्रिल २०२६ पर्यंत आहे. मात्र, या पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करून डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
पूल बांधण्याच्या अनुषंगाने माती परीक्षण, पायाबांधणी, खांबांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. बांधकामास अडथळा ठरणारी बांधकामे हटविण्यात आली आहेत. पूर्व बाजूला पोहोच रस्त्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने ४० तुळया स्थापन कराव्या लागणार आहेत. त्यापैकी ४ तुळया स्थापन करण्यात आल्या आहेत. आता, पश्चिम दिशेच्या पोहोच मार्गातील राहिलेल्या एका खांबाचे काम सुरू करण्यात येणार आहे. १४ सप्टेंबरपर्यंत तुळयांचे मजबुतीकरण, पुलाच्या प्रवास पृष्ठभागाची रचना करणे, स्लॅब कास्टिंग इत्यादी कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर, दोन्ही पोहोच मार्गांची कामे हाती घेऊन एकंदरीत दिनांक ३१ डिसेंबरपर्यंत पुलाचे संपूर्ण काम पूर्ण होईल, असे नियोजन आहे, असे बांगर यांनी सांगितले.