मुंबई : ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित योग दिन मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, वरळीतील एनएससीआय डोम, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफा, रुग्णालये, मुंबई विद्यापीठ, आयआयएम, आयटीआय मुंबई, सरकारी कार्यालयांसह विविध ठिकाणी सकाळी नागरिकांनी योगासने करून योग दिन साजरा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साजरा होत असलेला जागतिक योग दिनानिमित्त सकाळी मुंबईमध्ये सर्वत्र उत्साह दिसून येत होता. मुंबईचे प्रवेशद्वारे समजल्या जाणाऱ्या गेट वे ऑफ इंडिया येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे योगासने केली. यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश होता. गेट वे ऑफ इंडिया येथे भाजप नेते विनोद तावडे आणि अभिनेते मुकेश खन्ना उपस्थित होते. त्याचबरोबर गिरगाव चौपाटीवरही काही स्थानिक संस्थांच्या माध्यमातून योग शिबिरांचे आयाेजन करण्यात आले होते.
अणूशास्त्रज्ञांनी केली योगासने
मुंबईतील अणू ऊर्जा विभागामध्ये कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञांनी शनिवारी सकाळी ९ वाजता योगासने केली. योगशिक्षक पी. राजू यांच्या मार्गदर्शनाखाली अणूऊर्जा विभागाचे सचिव डॉ. ए. के. मोहंती, सहसचिव प्राजक्ता लवंगरे वर्मा, संचालक नितीन जावळे यांच्यासह वरिष्ठ शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी योगासने केली.
मुंबईतील सरकारी रुग्णालयांमध्ये योग उत्सव
कैवल्यधाम, मुंबई यांच्या माध्यमातून जे.जे. रुग्णालयात सकाळी ७ वाजता योग कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात १५२ जण सहभागी झाले होते. यामध्ये विद्यार्थी, डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी आदींचा समावेश होता. अंबिका योग कुटीरचे योग शिक्षक अमोल भुळे यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयामधील विद्यार्थी, डॉक्टर, कर्मचारी अशा १०० जणांना योगाचे प्रशिक्षण दिले. केईएम रुग्णालयामध्ये परिचारिकांमार्फत आयोजित कार्यक्रमामध्ये योगासन, सूर्यनमस्काराचे महत्त्व, विविध आसनांची माहिती व त्याचे फायदे समजावून सांगण्यात आले. केईएममध्ये सलग दोन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कूपर रुग्णालयामध्ये शरीरशस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. ललित चंदन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमामध्ये ६० वैद्यकीय अध्यापक व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रुग्णालयातील योग बाह्यरुग्ण विभागांतर्गत रुग्णालयात आलेल्या रुग्णांना योगतज्ज्ञ कमलेश सोलंकी व मनिष बालदे यांनी मार्गदर्शन केल्याची माहिती कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिली. त्याचप्रमाणे जी. टी. वैद्यकीय महाविद्यालय आणि कामा रुग्णालयातही योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आयआयएम व आयआयटीमध्ये योग शिबीर
आयआयएम, मुंबई येथील स्वामी विवेकानंद सभागृहाच्या तळघरात सकाळी ६ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रदर्शन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर कैवल्यधाम, मुंबई येथील अनुभवी प्रशिक्षकांनी प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिले. तसेच आयआयटी, मुंबईमध्ये इनडोअर बॅटमिंटन कोर्ट येथे सकाळी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येन उपस्थित होते.
मुंबई विद्यापीठात २०० विद्यार्थ्यांनी केला योग
मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि कैवल्यधाम यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षान्त सभागृहात आयोजित योग दिनासाठी १३० महाविद्यालयातील २०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रशिक्षित शिक्षकांकडून उर्ध्वपादासन, चक्रासन, पूर्ण पादासन, सूर्यनमस्कार, धनुरासन आणि भ्रामरी यांसह प्राणायमांचे विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कैवल्यधामचे सल्लागार म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी योग प्रात्यक्षिके केली.
कान्हेरी गुंफामध्ये प्रथमच योग शिबिराचे आयोजन
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफा येथे यंदा प्रथमच भारत पर्यटन कार्यालयातर्फे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्थानिक नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, भाजप नेते प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी या शिबिरात सहभागी होऊन योगासने केली. कांदिवली येथे चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने ‘योगा ऑन स्ट्रीट’चे आयोजन केले होते. दहिसर येथे गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानात आयोजित कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महानगरपालिकेच्या २५ विभाग कार्यालयांत योग सत्रे
मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागात (वॉर्ड) विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या समन्वयाने महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी, तसेच स्थानिक नागरिकांसाठी योग सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या योग सत्रांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या शिव योग केंद्रांवरही नागरिकांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले.
रेल्वेमध्ये नागरिकांनी केला योगाभ्यास
हार्बर मार्गावरील सीएसएमटी – वांद्रे आणि पश्चिम रेल्वेवरील वांद्रे – मुंबई सेंट्रलदरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये योग शिक्षकांसह हजारो प्रवाशांनी योगाभ्यास केला. या कार्यक्रमात ५० योग शिक्षकांनी हजारो प्रवाशांना लोकलमध्ये उभे राहून, आसनावर बसून योगासनाची प्रात्याक्षिके शिकवली. तसेच पश्चिम रेल्वेच्या विरार कारशेड आणि मुंबई सेंट्रल स्थानकात रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योगासने केली.