Maharashtra Rain Updates मुंबई : मुंबईत सोमवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला असून अनेक भागांमधील जनजीवन विस्कळित झाले आहे. विविध भागांमध्ये पाणी साचल्याने मुंबईकरांची त्रेधा उडाली आहे. मानखुर्द येथील शीव – पनवेल महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील गटारात कचरा तुंबल्याने संबंधित भागात पाणी साचले होते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून नालेसफाईला सुरुवात केली. महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही स्वच्छतेच्या कामांमध्ये दिरंगाई होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असून सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. पहाटेपासून कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. मानखुर्द येथील शीव पनवेल महामार्गाच्या सेवा रस्त्यावर अनेक वर्षांपासून कचऱ्याची समस्या आहे. पुरेशा कचरापेट्या नसल्यामुळे सेवा रस्त्यावर कायमच कचऱ्याचे ढीग लागलेले असतात. याबाबत अनेकदा महापालिकेकडे तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल घेण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सोमवारी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संबंधित कचरा वाहून रस्त्यालगतच्या गटारात जमा झाला. परिणामी, रस्त्यावर पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ लागली. ही बाब लक्षात येताच शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या साहाय्याने नालेसफाईला सुरुवात केली. मानखुर्द रेल्वे स्थानक परिसर प्रत्येक मुसळधार पावसात जलमय होतो. त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. महापालिकेने पाण्याचा निचरा होण्यासाठी संबंधित भागात एक पंप कार्यान्वित केला आहे. मात्र, तरीही तेथे कायम पाणी साचते. त्यामुळे पाणी उपसा पंपांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शीव पनवेल सेवा रस्त्यावरील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिकेकडे अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. तसेच, अनेकदा कचरा उचलण्यात अनेकदा दिरंगाई होते. सोमवारीही कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी पालिकेकडे करण्यात आली होती. मात्र, यंत्रणा वेळेवर हजर न झाल्याने कचरा वाहून नाल्यात गेला, असे शिंदे गटाचे युवा शाखा अधिकारी स्वप्नील काशिद यांनी सांगितले.