१५ शाळांमधील ११ ते १५ वयोगटातील बालकांची पाहणी

जंकफूडचे अतिसेवन आणि मैदानी खेळाचा अभाव यामुळे शहरातील १६ टक्के बालके स्थूल असून २१ टक्के बालकांना भविष्यात लठ्ठपणाचा धोका निर्माण होऊ शकतो, असे निरीक्षण आस्था हेल्थकेअरने नोंदविले आहे. संस्थेच्या ‘इको फॉर चेंज‘ या अभियानाअंतर्गत १५ शाळांमधील ११ ते १५ वयोगटातील जवळपास ९ हजार बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

तीन महिन्यांच्या या मोहिमेमध्ये ४८०६ मुले आणि ४१९४ मुलींचा वजन आणि उंचीनुसार बालकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला गेला. या तपासणी अहवालानुसार,  ४९०६ मुलांमधील १०२८ मुलांचे वजन अधिक आहे, तर ८१७ मुले लठ्ठ आहेत. ४१९४ मुलींपैकी ८०५ मुली अतिवजनाची असल्याची नोंद आहे, तर ६१२ मुली स्थूल आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बालकांपैकी जवळपास ६० टक्के बालके ही दिवसभरात दोन तासांहूनही अधिक काळ मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपमध्ये गुतंलेली असतात. वजन अधिक असलेल्या आणि स्थूल असलेल्या अशा दोन्ही गटातील बालकांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, आळस येणे, काम करण्यास उत्साह नसणे, प्रमाणापेक्षा अधिक घाम येणे, गळ्याजवळ गडद चट्टे येणे, हनुवटीच्या खाली, कंबर आणि पोटाजवळ अतिरिक्त चरबी जमा होणे, तणाव आणि थकवा जाणवणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येत असल्याचेही या अभ्यासात नोंदविले आहे. लहान बालकांमधील लठ्ठपणाचे प्रमाण वाढले असून पालक आणि शिक्षकांमध्ये याबाबत जनजागृती करणे, संतुलित आहार आणि व्यायामाचे महत्त्व पटवून देणे या उद्देशातून ‘इको फॉर चेंज’ हे अभियान राबविले जात असल्याची माहिती आस्था हेल्थकेअरने दिली आहे.