मुंबई : मुंबईत रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे चर्चगेट येथील कर्नाटक मैदानात पाणी साचले आणि रामलीला कार्यक्रम होऊ शकला नाही. गेली अनेक वर्षे आझाद मैदानात होणारा रामलीला कार्यक्रम दोन वर्षांपासून कर्नाटक मैदानात होत आहे. शिवसेनेच्या (शिंदे) दसरा मेळाव्यामुळे रामलीलासाठी आझाद मैदानाऐवजी कर्नाटक मैदानाचा पर्याय गेल्या दोन वर्षांपासून दिला जात आहे. मात्र कर्नाटक मैदानात पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने न झाल्यामुळे रामलीलाच्या सादरीकरणीकरणात यंदा अडथळा आला.
दरवर्षी नवरात्रोत्सवात मुंबईत विविध ठिकाणी रामलीलाचे आयोजन केले जाते. गेली ४० वर्षांहून अधिक काळ आझाद मैदानात रामलीलाचे आयोजन केले जात होते. मात्र शिवसेनेच्या (शिंदे) २०२३ मधील दसरा मेळाव्यासाठी रामलीला लवकर गुंडाळावी लागली होती. तेव्हापासून रामलीला आयोजकांना आझाद मैदानाऐवजी चर्चगेटमधील कर्नाटक फूटबॉल ग्राऊंडवर रामलीला सादर करण्यासाठी परवानगी दिली जात आहे. गेली दोन वर्षे रामलीला याच मैदानावर सादर केली जात आहे.
यंदाही शिवसेनेचा (शिंदे) दसरा मेळावा आझाद मैदानात होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रामलीलासाठी कर्नाटक ग्राऊंड देण्यात आले आहे. मात्र मुंबईत रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे या मैदानावर गुडघाभर पाणी साचले. रामलीला कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेल्या व्यासपीठ परिसरात गुडघाभर पाणी साचल्यामुळे प्रेक्षकांच्या खुर्च्याही पाण्यातच होत्या. त्यामुळे रामलीलाचे सादरीकरण रविवारी होऊ शकले नाही. परिणामी, रामलीला सादर करणाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
पावसाच्या पाण्याचे विघ्न
वनवास स्वीकारल्यानंतर श्रीरामांना अयोध्यावासी थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. या वनगमन प्रसंगाचे सादरीकरण रविवारी होणार होते. तसेच वनात जाताना प्रभू श्रीरामांना गंगा नदी पार करायची असतो, तेव्हा केवट नावाचा नावाडी त्यांना भेटतो. त्याच्याशी श्रीरामांचा जो संवाद होतो त्याचेही सादरीकरण होणार होते. मात्र मैदानात पावसाचे पाणी साचल्यामुळे गंगा नदी पार करण्याचे सादरीकरण होऊच शकले नाही. हे सर्व सादरीकरण आता उर्वरित दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र रामलीला मंडळाचे उपाध्यक्ष संदीप शुक्ला यांनी दिली.
परवानगी प्रक्रियेतही विसंगती
कर्नाटक मैदानात रामलीला आयोजित करीत असल्यापासून परवानगी प्रक्रियेतही विसंगती असल्याचे संदीप शुक्ला यांचे म्हणणे आहे. आयोजनाची परवानगी क्रीडा विभागाचे संचालक देतात. तरीदेखील कर्नाटक स्पोर्टस असोसिएशनकडून स्वतंत्र ना हरकत प्रमाणपत्र आयोजकांना घ्यावे लागते. त्याशिवाय पोलिस विभाग, मुंबई महानगरपालिका यांच्याकडूनही परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे या सर्व परवानगी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी एक खिडकी सुविधा द्यावी, अशी मागणी शुक्ला यांनी केली आहे.