Mumbai CNG Supply Shortage: वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य वाहिनीमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. तेव्हापासूनच मुंबईला होणारा सीएनजी वायूचा पुरवठा ठप्प झाला. याचे गंभीर पडसाद सोमवारी सकाळपासून मुंबई महानगरात दिसले. बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, शालेय बसची सेवा विस्कळीत झाली. परिणामी, नोकरदार वर्ग, विद्यार्थींना याचा फटका बसला. तर, रिक्षा, टॅक्सी चालकांचा व्यवसाय बंद पडल्याने, चालकांचे आर्थिक नुकसान झाले.
झाले काय?
वडाळा येथील आरसीएफ परिसरात असणाऱ्या गॅस वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाला. बिघाड दुरुस्तीची कामे सुरू असल्याने, सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होईल, याबाबत शंका आहे. सध्या रस्त्यावर धावत असलेल्या रिक्षा, टॅक्सी आणि कॅबचालकांच्या वाहनांमधील सीएनजी संपला. सीएनजी अभावी रिक्षा-टॅक्सी रस्त्याच्याकडेला उभ्या आहेत. तसेच अनेक खासगी वाहनधारकांनी सीएनजी वाहने घराबाहेर काढली नाहीत.
फटका किती
मुंबई महानगर प्रदेशातील सुमारे १३३ सीएनजी पंपांवर याचा परिणाम झाला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील रिक्षा आणि टॅक्सी सीएनजीवर धावतात. यासह बेस्टच्या एकूण ताफ्यातील ४५ टक्के बस या सीएनजीच्या आहेत. त्यामुळे बेस्ट बस सेवा रखडली. तसेच ज्यांच्याकडे सीएनजी बेस्ट अॅप आहे, त्यांनाच गोरेगाव, घाटकोपर, गोराई, आणिक, प्रतीक्षा नगर, मागाठाणे, देवनार, सेंट्रल डेपो, पोइसर येथे सीएनजी उपलब्ध करून दिला.
टॅक्सी, रिक्षा चालकांकडून भाडेकोंडी
रिक्षा, टॅक्सी सेवा ४० टक्के बंद झाली. तर, सध्या धावत असलेल्या रिक्षा-टॅक्सी दुपारपर्यंत सीएनजीअभावी थांबतील. या आपत्तीजनक काळात शेअरिंग रिक्षा, टॅक्सी काही वेळ तग धरून राहतील. परंतु, त्याही बंद होण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत ८० टक्के रिक्षा, टॅक्सी सेवा बंद होतील. टॅक्सी, रिक्षा चालकांनी लांबची भाडे स्वीकारणे बंद केले. सीएनजीचा पुरवठा सुरू झाल्यानंतर, सीएनजी पंपावर लांबच्या लांब रांगा लागतील. त्यामुळे मुंबईतील प्रत्येक रिक्षा, टॅक्सीमध्ये सीएनजीचा पुरवठा होण्यास प्रचंड विलंब होईल. मंगळवारीही याचे पडसाद सोसावे लागतील.
परिस्थिती केव्हा सुधारेल?
मंगळवारपर्यंत सकाळपर्यंत सीएनजीचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. सध्या विमानतळ परिसरातील सीएनजी पंप सुरू आहे. तर, बोरिवलीतील चामुंडा सर्कल येथील सीएनजी पंप सुरू असला तरी, तिथे कमी दाब आहे. त्यामुळे सोमवारी रात्रीपर्यंत संपूर्ण रिक्षा-टॅक्सी बंद होण्याची चिन्हे आहेत.
एमजीएलमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे एक दिवसाचे आर्थिक नुकसान होईल. एमजीएलने रिक्षा, टॅक्सी चालकांना आर्थिक भरपाई द्यावी.- शशांक राव, अध्यक्ष, ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती
सीएनजी पुरवठा बंद झाल्याने सोमवारी सकाळपासून रिक्षा, टॅक्सीची सेवा ठप्प झाली. सध्याच्या घडीला ४० टक्के रिक्षा, टॅक्सी सेवा बंद आहे. ज्या रिक्षा, टॅक्सी चालकांचे सीएनजीचा साठा आहे, त्या रिक्षा, टॅक्सी सायंकाळपर्यंत रस्त्यावर धावतील.- ए. एल. क्वाड्रोस, सरचिटणीस, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन
मीरा रोड, भाईंदरसह संपूर्ण मुंबई महानगरातील सीएनजीवर धावणाऱ्या शालेय बस, व्हॅनवर परिणाम झाला. शालेय व्हॅन सेवा ७० ते ८० टक्के बंद आहेत. तर, शालेय बस ६० टक्के बंद आहेत. सीएनजीचा पुरवठा न झाल्यास, मंगळवारी शालेय बस, व्हॅन पूर्णपणे बंद होतील.- अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ऑनर्स असोसिएशन
