मुंबई : सागरी किनारा मार्गालगत भराव टाकून तयार करण्यात आलेल्या जमिनीवर नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन महानगरपालिकेने केले आहे. त्यातील ११.६६ हेक्टर जमिनीवर सायकल आणि धावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष मार्गिकेचे काम आता पूर्ण झाले आहे. मात्र, या मार्गिका मुंबईकरांना केव्हा उपलब्ध होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मार्गिकांच्या लोकार्पणाला मुहूर्त सापडत नसल्याने मुंबईकरांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. यापूर्वीही उद्घाटनाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, काही कारणांनी त्या रद्द झाल्या.

मुंबईकरांना निर्धास्तपणे चालता यावे यासाठी मुंबईत पायाभूत सुविधांचा अभाव आहे. उपनगरांच्या तुलनेत शहर विभागात काहीशी समाधानकारक स्थिती आहे. मात्र, तरीही नागरिकांना चालण्यासाठी स्वच्छ, सुटसुटीत, मोकळी जागा मिळावी यासाठी सागरी किनारा मार्गालगतच्या भरावभूमीवर महानगरपालिकेने सायकल आणि धावण्यासाठी विशेष मार्गिका तयार केली आहे. महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गासाठी समुद्रात भराव टाकून १११ हेक्टर जमीन तयार करण्यात आली. त्यापैकी सुमारे २५ ते ३० टक्के क्षेत्रात सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे.

उपलब्ध क्षेत्रापैकी ११.६६ हेक्टर क्षेत्रावर नागरिकांसाठी सायकल आणि धावण्यासाठी मार्गिका तयार करण्यात आली आहे. त्यात ठिकठिकाणी आसन व्यवस्था व वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच, उर्वरित जागा उद्यान, शौचालये, प्रसाधनगृह, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, बस थांबे आदी विविध सुविधांसाठी वापरण्यात येत आहे. सागरी किनारा मार्गालगतच्या जमिनीवर सायकल आणि धावण्यासाठी विशेष मार्गिका बांधण्यात आली आहे. मार्गिकेचे सर्व काम पूर्ण झाले असून मुंबईकर या मार्गिकांच्या लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. यापूर्वी २२ व २५ जून रोजी लोकार्पणाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, काही कारणांमुळे ते रद्द करावे लागले. लोकार्पणाचा दिवस निश्चित होत नसल्याने आणखी किती काळ वाट बघायची, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

सागरी किनारा मार्गाची वैशिष्ट्ये

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असणार आहे. या रस्त्याची लांबी १०.५८ कि.मी. असून या रस्त्यावर संख्या दोन्ही बाजूला प्रत्येकी चार मार्गिका आहेत. तर बोगद्यांमध्ये दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन मार्गिका आहेत. भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी ४.३५ कि.मी. असून पुलांची एकूण लांबी २.१९ कि.मी.आहे. या मार्गातील मलबार हिल टेकडीच्या खालील दुहेरी बोगद्यांची लांबी प्रत्येकी २.०७२ कि.मी. असून त्याचा अंतर्गत व्यास ११ मीटर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचे एकूण भरावक्षेत्र १११ हेक्टर इतके असून तीन ठिकाणी आंतरबदल असतील. त्यांची लांबी १५.६६ कि.मी. इतकी आहे. ७.५ कि.मी. लांबीचे नवीन पदपथ असून बस वाहतुकीसाठी समर्पित मार्गिका ठेवण्यात आली आहे. समुद्री लाटांपासून बचावासाठी ७.४७ कि.मी. लांबीची सागरी तटरक्षक भिंत असणार आहे. या प्रकल्पात अमरसन्स, हाजी अली, वरळी डेअरी, थडाणी जंक्शन, वरळी येथे सार्वजनिक वाहनतळाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.