मुंबई : मुंबई महापालिकेचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला सागरी किनारा मार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मार्गाच्या बोगद्यामधील रस्त्यावर तडे (क्रॅक) गेल्याची ध्वनीचित्रफित समाज माध्यमावर फिरत आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने मात्र आरोप फेटाळले आहेत.
तब्बल चौदा हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या सागरी किनारा मार्गाच्या बोगद्यामधील एक ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर फिरत आहे. सामाजिक कार्यकर्ते झोरू बथेना यांनी ही ध्वनीचित्रफीत प्रसारित केली असून सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर तडे गेल्याबाबत त्यांनी महापालिकेवर टीका केली आहे.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पांतर्गत प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या स्वराज्य भूमीलगतच्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत दोन समांतर बोगदे जातात. यापैकी एका बोगद्यातील ही ध्वनीचित्रफीत आहे. रस्त्याच्या मधोमध हे तडे असून ते बुजवलेले दिसत आहेत.
दरम्यान, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले असून हे तडे नाहीत तर केवळ काँक्रिटच्या दोन प्रतलांमधील जोड सांधे आहेत असे स्पष्टीकरण दिले आहे. सागरी किनारा मार्गाचा महत्त्वाचा भाग असणारे महाबोगदे हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर आहेत. दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.०७ किलोमीटर एवढी आहे. तसेच दोन्ही बोगद्यांचा व्यास हा प्रत्येकी १२.१९ मीटर आहे. या बोगद्यांना वर्तुळाकृती पद्धतीने काँक्रिटचे अस्तर आहे. त्यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा प्रत्येकी ११ मीटर इतका आहे.