मुंबई : मुंबईत शनिवारी सायंकाळपासून पाऊस कोसळत असून रविवारी पहाटेपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. दिवसभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, रविवारी दुपारी २.५२ च्या सुमारासा समुद्राला मोठी भरती येणार आहे. या कालावधीत सुमारे ४.२७ मीटर उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच, हवामान विभागाने रविवारीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. भरतीच्या कालावधीत मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईतील सखलभाग जलमय होऊन वाहतूक सेवा कोलमडण्याची शक्यता आहे.
मुंबईत शनिवारी सायंकाळी, तसेच मध्यरात्री काही भागात पावासाचा जोर कायम होता. त्यानंतर रविवारी पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार रविवारी दिवसभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी दुपारी २.५२ वाजता समुद्राला मोठी भरती येणार असून सुमारे ४ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. रविवारी रात्री ८.५५ वाजता भरतीचा जोर कमी होणार असून समुद्राच्या लाटाही शांत होतील. मात्र, भरतीच्या कालावधीत मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईतील सखलभाग जलमय होऊन जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पहिल्याच पावसात मुंबईतील सखल भागात पाणी साचून मुंबईकरांची दैना उडाली होती. परिणामी, वाहतूक सेवा विस्कळीत झाली. नोकरदारांचे प्रचंड हाल झाले होते. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.
आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये
नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दादर, परळ, वरळी, प्रभादेवी, मालाड ,बोरिवली, कांदिवली, गोरेगाव परिसरात शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. तर काही भागात पावसाची रिपरिप सुरूच आहे. दिवसभरात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.