मुंबई : विविध बॅंका ग्राहकांना आकर्षक योजना सांगून क्रेडिट कार्ड देतात. मात्र याच क्रेडिट कार्डाचे तपशील मिळवून सायबर भामटे ग्राहकांची सायबर फसवणूक करीत असल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईतील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी नवीन क्रेडिट कार्ड घेतले होते. मात्र त्याचा वापर न करताच त्यांना सायबर फसवणुकीचा फटका बसला. अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचा एक गुन्हा मालाड येथे दाखल करण्यात आला आहे.
मालाडमधील एका महाविद्यालयात प्राचार्य असलेले ४८ वर्षीय फिर्यादी मालाड पश्चिम येथे राहतात. त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २ मे २०२५ रोजी एका बँकेचे व्यवस्थापक त्यांच्या महाविद्यालयात आले होते. त्यांनी प्राचार्यांना क्रेडिट कार्ड घेण्याचा सल्ला दिला. तक्रारदार प्राचार्यांनी सुरुवातीला नकार दिला, मात्र व्यवस्थापकाने ऑफर्स सांगून कार्ड घेण्यास प्रवृत्त केले. यानुसार, ७ एप्रिल रोजी प्राचार्यांना बॅंकेचे क्रेडिट कार्ड कॉलेजच्या पत्त्यावर टपालाद्वारे आले आणि २१ एप्रिल रोजी सेवा केंद्राच्या माध्यमातून ते सक्रियही झाले. मात्र, प्राचार्यांनी ते कार्ड कधीही वापरले नव्हते
….आणि फोन हॅक झाला
तक्रारदार प्राचार्य ९ जून रोजी दुपारी अडीच वाजता महाविद्यालयात असताना त्यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. त्या व्यक्तीने स्वत:ला संबंधित बँकेच्या बीकेसी शाखेतील अग्रवाल असल्याचे सांगत ओळख दिली. प्राचार्यांच्या नावाने एक आरोग्य विमा सक्रिय झाला आहे. मात्र मी कुठलाही आरोग्य विमा (मेडीक्लेम पॉलीसी) घेतला नसल्याचे प्राचार्यांनी सांगितले. त्यामुळे तो बंद करण्यासाठी त्यांना एक लिंक व्हॉटस ॲपवर पाठवली आणि त्यात क्रेडिट कार्डाचे तपशील भरण्यास सांगितले. त्यानुसार प्राचार्यांनी ती लिंक उघडून त्यात क्रेडिट कार्ड क्रमांक, सीवीवी, आणि एक्सपायरी डेट असा तपशील भरला. मात्र जेव्हा जन्म तारीख विचारण्यात आली तेव्हा त्यांना संशय आला. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता, कारण सायबर भामट्यांनी त्यांचा मोबाइल हॅक केला होता. मोबाइल काम करेनासा झाला. काही वेळाने मोबाइल सुरू झाला.
तीन दिवसांनी बॅंकेतील रक्कम लंपास
या घटनेनंतर तीन दिवसानी म्हणजे १२ जून रोजी तक्रारदार प्राचार्यांना बॅंकेचा ई-मेल आला. तेव्हा त्यांना समजले की त्यांच्या खात्यातून ५० हजार ५०१ रुपये काढण्यात आले आहेत. या सायबर फसवणुकीबाबत प्राचार्यांनी तत्काळ बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधून नंतर मालाड पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) (फसवणूक) आणि ३१९ (२) (खोटे भासवून फसवणूक), तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा मालाड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
फसवणूक कशी झाली ?
सायबर भामट्यांना तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डाचे तपशील मिळाले होते. त्यानुसार तक्रारदाराशी संपर्क साधण्यात आला. त्यांना एक लिंक पाठवून त्यांचा मोबाइल हॅक करण्यात आला आणि बॅंक खात्यातील पैसे लंपास केले. असे पोलिसांनी सांगितले.
तपशील चोरी होण्याचे मार्ग:
फिशिंग
बनावट संकेतस्थळे, ई-मेल्स, किंवा एसएमएसद्वारे तुमच्याकडून कार्डाची माहिती मागितली जाते.
उदा: “तुमचं कार्ड बंद होणार आहे, ही लिंक क्लिक करा.”
स्कीमिंग
एटीएम किंवा कार्ड स्वाइप यंत्रावर खोटे उपकरण बसवून माहिती चोरली जाते.
मालवेअर
तुमच्या फोन किंवा संगणकात वाईट सॉफ्टवेअर घालून माहिती चोरतात.
डेटा ब्रीच
एखाद्या कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची क्रेडिट कार्ड माहिती लिक होते.
पब्लिक वायफाय वापर असुरक्षित वायफायवर कार्ड तपशील टाकल्यास ते सहज चोरले जाऊ शकतात.