मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढण्याची तयारी सुरू असतानाच महाविकास आघाडीत काँग्रेसने स्वबळावर ही निवडणूक लढण्याची घोषणा शनिवारी अधिकृतपणे केली. शिवसेना- मनसेची होणारी संभाव्य युती लक्षात घेता हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर होणारी फरफट रोखण्यासाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे.
मुंबई काँग्रेसचे एक दिवसीय शिबिर मालाडमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यात मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली. या वेळी पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सहप्रभारी यु. बी. व्यंकटेश, आमदार अस्लम शेख, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधू एकत्र येणार हे निश्चित झाल्याने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने एकत्र लढण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेना, ‘मनसे’मुळे मराठी मतांचे ध्रुवीकरण होऊन आव्हान उभे राहू शकते याचा अंदाज भाजप नेत्यांना आला आहे. यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बरोबर घेण्याची भाजपची भूमिका आहे.
महाविकास आघाडीने ‘मनसे’ला बरोबर घेऊन निवडणूक लढविण्याची शिवसेना ठाकरे गटाची योजना होती. या दृष्टीने खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी प्राथमिक चर्चा केली होती. काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याचा मतप्रवाह होता. दिल्लीतील केंद्रीय नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर आज मुंबईत स्वबळावर लढण्याची घोषणा झाली.
स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला तरीही काँग्रेस समविचारी पक्षांबरोबर आघाडी करणार आहे. यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाशी संपर्क साधण्यात येणार आहे. रिपब्लिकन पक्षाचा गवई गट, डाव्या पक्षांबरोबर चर्चा करण्यात येणार आहे, असे पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले.
तीन कारणांसाठी निर्णय
१. अमराठी मतांचे विभाजन करणे
शिवसेना आणि ‘मनसे’बरोबर लढल्याने काँग्रेसच्या मतपेढीवर परिणाम होत असल्याचा पक्षात मतप्रवाह होता. शिवसेना ठाकरे गटाचा चेहरा हिंदुत्वाचा आहे. ‘मनसे’ला बरोबर घेतल्यास अमराठी मतदार दूर जाण्याची भीती होती. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भायखळा, वर्सोवा अशा काही काँग्रेसच्या हक्काच्या जागा पदरात पाडून घेतल्या व त्यात विजय मिळविला. शिवसेना व मनसेबरोबर गेल्याने फरफट होत असल्याची पक्षात भावना होती. तसेच अमराठी मतदार पक्षापासून दूर जाऊन त्याचा भाजपला फायदा झाला असता. यामुळेच तिरंगी लढतीत अमराठी मतांचे किमान भाजप व काँग्रेसमध्ये विभाजन होईल, अशी काँग्रेसची भूमिका आहे.
२. ‘मनसे’मुळे मुस्लीम मतदार दुरावेल
मुस्लीम मतदार काही प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असले तरी राज ठाकरे शिवसेने बरोबर असल्यास मुस्लिमांची एक गठ्टा मते शिवसेनेला मिळणार नाहीत, असे काँग्रेसचे गणित आहे. तसेच महाविकास आघाडीतून लढल्यास शिवसेना-मनेसेने काँग्रेसला ४०च्या आसपास जागा सोडल्या असत्या. यातून पक्षात नाराजी वाढली असती. यामुळेच पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले.
३. पक्ष गळतीची भीती
मुंबई महापालिकेच्या सर्व २२७ जागा लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पक्षातील संभाव्य गळती रोखली जाईल. अन्यथा लढण्याची संधी नाही हे लक्षात घेऊन काही जणांनी पक्षाला रामराम ठोकला असता. त्यामुळे आणखी पक्ष अडचणीत आला असता, अशी भीती पक्षाच्या नेत्यांना आहे.
काँग्रेस ३० वर्षे विरोधी बाकांवर
मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या अवघ्या ३० जागा निवडून आल्या होत्या. पक्षाची हे निचांकी संख्याबळ होते. मुंबई महानगरपालिकेत १९९२ मध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली होती. १९९५ मध्ये काँग्रेसचा मुंबईत शेवटचा महापौर निवडून आला होता. त्यानंतर गेल्या ३० वर्षांत मुंबईत काँग्रेसला कायम विरोधी बाकांवर बसावे लागले. स्वबळावर लढताना २०१७ पेक्षा परिस्थिती सुधारण्याचे आव्हान वर्षा गायकवाड व अन्य नेतेमंडळींवर असेल.
कार्यकर्त्यांना संधी हवी – वर्षा गायकवाड
पक्षश्रेष्ठींनी स्थानिक पातळीवर आघाडीचा निर्णय घेण्याची मोकळीक दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. कार्यकर्त्यांना यामध्ये संधी मिळायला हवी. काही पक्ष कायदा सुव्यवस्था हातात घेतात. त्या पक्षाची संस्कृती आमच्या पक्षशिस्तीत बसत नाही. त्यामुळे मुंबई पालिकेची निवडणूक आम्हाला स्वबळावर लढवायची आहे, राज्य प्रभारी आणि सहप्रभारी यांच्याकडे भूमिका मांडली आहे. त्यांनी होकार दिला आहे.
