मुंबई : मुंबईतील सर्व बांधकाम सुरू असलेल्या इमारतींच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजनांचे तातडीने लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याची मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून केली आहे.

जोगेश्वरी पूर्व येथे ८ ऑक्टोबर रोजी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी उंचावरून वीट पडल्याने संस्कृती अमीन (२२) हिचा मृत्यू झाला होता. या घटनेची चौकशी करण्यात यावी आणि सुरक्षाविषयक नियमांचे पालन होत आहे किंवा नाही, याची काटेकोर तपासणी करण्यात यावी, अशी मागणी साटम यांनी आयुक्तांकडे केली आहे.

जोगेश्वरी येथील बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन केले जात नसल्याच्या तक्रारी याआधी करण्यात आल्या होत्या. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी संबंधितांविरोधात कारवाई केली नव्हती. ही बाब खरी असल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी साटम यांनी केली आहे.