मुंबई : गेल्या काही वर्षांपासून एकीकडे मुंबईत गगनचुंबी इमारतींची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे गगनचुंबी इमारतींच्या बांधकामादरम्यान होणाऱ्या दुर्घटना आणि अपघातांच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे या दुर्घटना आणि अपघात रोखण्यासाठी नगरविकास विभागाने सुरक्षा नियंत्रण मार्गदर्शक सूचना जारी केल्या केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार आता मुंबई महानगरपालिकेच्या इमारत आणि प्रस्ताव विभागाकडून शहरातील प्रत्येक गगनचुंबी इमारतींच्या बांधकामस्थळी परवानाधारक सुरक्षा अधिकारी नेमणे बंधनकारक असणार आहे. तसेच, बांधकाम स्थळी कोणतीही दुर्घटना आणि अपघात होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्याची जबाबदारी परवानाधारक सुरक्षा अधिकाऱ्याची असणार आहे.

मुंबईत सध्या १०० मीटर उंचीपर्यंतच्या ४००० हून अधिक इमारती आहेत. तर २०० मीटर उंचीच्या ४७ आणि २५० मीटर उंचीच्या २४ इमारती आहेत. अशात आता मुंबईतील उंच, गगनचुंबी इमारतींची संख्या भविष्यात आणखी वाढणार आहे, कारण मुंबईत १५० ते ३३१ मीटर उंचीच्या ४१६ इमारती उभारल्या जाणार आहेत. या इमारतींचे प्रस्ताव पालिकेकडे सादर झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुंबईत एक ४०० मीटरची इमारतही प्रस्तावित आहे. अशा उंच, गगनचुंबी इमारती उभारताना क्रेन कोसळून अपघात होतात वा उंचावरून कोसळून कोणाचा मृत्यू होतो. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. बांधकाम स्थळाच्या जवळून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो आहे.

२०२३ मध्ये गगनचुंबी इमारतींच्या बांधकामादरम्यान ४२ व्या मजल्यावरून काही भाग कोसळून दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाकडून गगनचुंबी इमारतीच्या बांधकामादरम्यान होणारे अपघात रोखण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने यासंबंधीचा एक अहवाल तयार केला होता, या अहवालाच्या आधारे नगरविकास विभागाने सुरक्षा नियंत्रण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

नगरविकास विभागाच्या या सूचनांनुसार आता पालिकेला प्रत्येक गगनचुंबी इमारतींच्या बांधकाम स्थळी परवानाधारक सुरक्षा अधिकारी नियुक्त करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवानाधारक वास्तुशास्त्रज्ञाप्रमाणे परवानाधारक सुरक्षा अधिकारी असणार असून त्याच्यावर सुरक्षेच्या संबंधित सर्व बाबींची जबाबदारी असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या सुरक्षा अधिकाऱ्याला सर्व यंत्रसामुग्रीच्या हाताळणीपासून बांधकामासंबंधीच्या सर्व कामांची योग्य ती माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक स्थळावर परवानाधारक सुरक्षा अधिकारी क्रेनचे काम संपेपर्यंत प्रकल्पस्थळी असणे आवश्यक असणार आहे. तर १०० मीटर वा त्यापेक्षा अधिक उंचीपर्यंतच्या इमारतींच्या बांधकामस्थळी सुरक्षा पथक, सर्व उपकरणे आणि कुशल क्रेन चालक आहे की नाही या सर्व गोष्टीसाठीही हा सुरक्षा अधिकारी जबाबदार असणार.

महत्त्वाचे म्हणजे पालिकेने बांधकाम कालावधीच्या प्रत्येक सहा महिन्याने सुरक्षासंबंधित उपायांचा आणि नियमांच्या उल्लंघनाचा अहवाल मागविणे आवश्यक असणार आहे. या अहवालानुसार नियमबाह्य गोष्टींसाठी हा अधिकारी जबाबदार असणार. तर वेळोवेळी सुरक्षा तपासणी करणे पालिकेसाठी गरजेचे असणार आहे. नगरविकास विभागाच्या या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी पालिकेकडून सुरू झाल्यास गगनचुंबी इमारतींच्या बांधकामादरम्यान होणाऱ्या दुर्घटना रोखण्यास मदत होईल, अशी आशा या निमित्ताने व्यक्त होते आहे.