मुंबई : गुन्हे शाखेने नागपाड्यातील दोन दुकानांवर छापा टाकून ॲपल कंपनीचे बनावट मोबाइल साहित्य (एक्सेसरी) आणि सॅनडिस्क कंपनीचे पेनड्राईव्ह, मेमरी कार्ड असा एकूण सुमारे अडीच कोटीचा साठा जप्त केला. गुन्हे नियंत्रण शाखेने (सी.बी. कंट्रोल) बुधवारी ही कारवाई केली आहे.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, नागपाड्यातील लकडा बाजार आणि शुक्लाजी स्ट्रीट येथील दोन दुकानांमध्ये बनावट साहित्याचा कोट्यवधी रुपयांचा साठा असल्याची माहिती मिळाली. तसेच दुकानदार समाज माध्यमांवर जाहिरात करून या बनावट साहित्याची विक्री करीत असल्याचे समजताच पथकाने बुधवारी दुकानावर छापा टाकला. या कारवाईत दोन कोटी ५४ लाख रुपये किंमतीचे एकूण ५६ हजार १३३ नग बनावट साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे.