अनिश पाटील
‘सडक २’ आणि ‘बाटला हाऊस’सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री क्रिसन परेराला अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी संयुक्त अरब अमिरातीमधील शारजा येथे अटक करण्यात आली होती. तस्करीच्या या प्रकरणात क्रिसनला अडकवण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या प्रयत्नानंतर आता ती भारतात परतली आहे. क्रिसेनप्रमाणे अमलीपदार्थाच्या खोटय़ा गुन्ह्यांत अडकवलेल्या क्लेटन रॉड्रिक्सला मात्र शारजामध्ये २५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहेत. शिक्षेमुळे क्लेटन व त्याच्या कुटुंबीयांपुढील तांत्रिक अडचणी वाढल्या असल्या, तरी गुन्हे शाखेने याप्रकरणी भक्कम पुरावे उभे केल्यामुले आता क्लेटनच्याही परतीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
अभिनेत्री क्रिसन परेरा प्रकरणात सूड भावनेने अॅन्थोनी पॉलने संपूर्ण कट रचला होता. क्रिसनची आई प्रेमिला परेरा यांना यावर्षी २३ मार्च रोजी एक संदेश आला होता. या संदेशात तुमच्या मुलीला परदेशात काम मिळवून देतो, असे सांगण्यात आले होते. रवी नावाच्या व्यक्तीने आपण व्यवस्थापन कंपनीत कामाला असल्याचे सांगितले. एका आंतरराष्ट्रीय वेब मालिकेसाठी क्रिसनला काम देण्याचे आमिष दाखवून दुबईला पाठवण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार १ एप्रिल रोजी क्रिसन दुबईसाठी रवाना होणार होती. त्याच्या आदल्या दिवशी रवी एका हॉटेलमध्ये क्रिसनला भेटला आणि तिच्याकडे एक चषक सोपवला. एक व्यक्ती शारजा विमानतळावर तुला घ्यायला येईल, असे सांगितले. तो चषक घेऊन क्रिसन दुबईला पोहोचली. त्यावेळी तिला कोणीच भेटायला आले नाही. त्यावेळी तिला हॉटेलपर्यंत नेण्यासाठी कोणी आले नाही. तसेच तिच्या संपर्कात असलेल्या रवीने त्याचे सर्व संदेश डिलीट केल्यानंतर तिला संशय आला. प्रथम क्रिसनने तो चषक कचऱ्याच्या डब्यात फेकला पण काहीतरी वाईट होईल, असे तिला वाटत होते. म्हणून तिने वडिलांना दूरध्वनी करून घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी क्रिसनला वडिलांनी पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी तिच्याकडील चषक, तसेच केकची तपासणी केली. सुरुवातीला काही सापडले नाही. पण तो चषक तोडल्यानंतर त्यात त्यांना गांजा सापडला. त्यानंतर शारजा पोलिसांनी तिला अटक केली.
याप्रकरणानंतर क्रिसनच्या आई-वडिलांनी वाकोला पोलिसांकडे तक्रार केली. वाकोला पोलिसांनी राजेश दामोदर बोभाटे ऊर्फ रवी ऊर्फ प्रसाद राव व अॅन्थोनी अॅलेक्स पॉल या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींनी शारजामधून क्रिसनला सोडवण्यासाठी एक कोटी आठ लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या कक्ष-१० च्या पोलिसांनी राजेश व पॉल या दोघांना अटक केली. त्यानंतर पॉलला गांजा पुरवणाऱ्या शांतिलाल राजपूत (२८) यालाही पोलिसांनी अटक केली.
चौकशीत मुख्य आरोपी पॉलने क्रिसनप्रमाणे ऋषिकेश पांडय़ा, केन रॉड्रिक्स, क्लेटन रॉड्रिक्स व मोनिशा डिमेलो यांनाही परदेशात पाठवले होते. त्यातील क्रिसन व क्लेटन रॉड्रिक्स यांना शारजा पोलिसांनी अटक केली. या सर्वाच्या कुटुंबीयांशी पॉलचा वाद झाला होता. त्याचा सूड घेण्यासाठी त्याने या सर्वाना शारजाला पाठवून तस्करीच्या प्रकरणात अडकवले होते. मुख्य आरोपी पॉलशी कुत्र्यावरून झालेल्या वादातून त्याने क्रिसनला खोटय़ा अमलीपदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात अडकवले होते. या संपूर्ण प्रकरणातून क्रिसन सुखरूप परतली. पण पॉलने अडकवलेला क्लेटन अद्याप तेथील तुरुंगात आहे. त्याला याप्रकरणी २५ वर्षांची शिक्षा झाली आहे.
क्लेटन व्यवसायाने डिस्क जॉकी (डीजे) आहे. क्लेटन हा देखील मुख्य आरोपी पॉलच्या संपर्कात होता. क्लेटन त्याच्या पत्नीसह आरोपी अॅन्थोनीच्या वर्जेश्वरी येथील फार्महाऊसवर गेले होते. त्यावेळी अॅन्थोनीच्या प्रेयसीबाबत क्लेटनने बदनामीकारक टिप्पणी केली होती. त्यावरून अॅन्थोनी नाराज झाला होता. अॅन्थोनीने चार-पाचवेळा बोलताना त्या गोष्टीचा उल्लेख केला होता. त्यानंतर यावर्षांच्या जानेवारी महिन्यात क्लेटनला प्रसाद राव नावाच्या व्यक्तीचा दूरध्वनी आला होता. त्याने फेब्रुवारीत त्याला परदेशात कामाला पाठवले. जाताना त्याने एक केकही पाठवला होता. त्यात अमलीपदार्थ सापडले होते. त्याला अटक झाल्यानंतर जून महिन्यात त्याला २५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे क्लेटनला मायदेशी परत आणणे अधिक अवघड झाले आहे. गुन्हे शाखेने याप्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यात आरोपी पॉलने क्लेटनलाही कसे अडकवले, हेही नमूद केले आहे. त्यामुळे हा संपूर्ण तपास व मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे आरोपपत्र क्लेटनच्या प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आता क्रिसनप्रमाणे क्लेटन कधी परत येतोय, याकडेही गुन्हे शाखा लक्ष ठेऊन आहे.