हौशी समूहांकडून शहर पर्यटनाचे उपक्रम; व्यावसायिक कंपन्यांकडूनही ‘सायकल टूर’चे आयोजन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यायामासाठी हमखास उपाय म्हणून लोकप्रिय होत असलेल्या सायकलींना आता पर्यटनासाठीही पसंती मिळत आहे. सायकलीच्या चाहत्यांचे हौशी समूह तयार झाले असून ‘नाइट राइड’, ‘ब्रेकफास्ट सायकलिंग’ अशा उपक्रमांतून शहराची रपेट मारण्यात येत आहे. सायकलींवरून मुंबई दर्शनाची ही टूम आता व्यावसायिकही होऊ आहे.

सायकलिंगचे आकर्षण वाढत चालले असून मुंबईत तरुण-तरुणींचे अनेक समूह तयार झाले आहेत. दिवसभर धावणारे शहर रात्री शांत झाल्यानंतर हे चमू सायकली घेऊन निघतात. विशेषत: दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारती किंवा पुरातन वास्तू, शिल्पांची सफर सायकलींवरून केली जाते. यात मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत, काळा घोडा, हॉर्निमल सर्कल, चर्चगेट असा हा प्रवास पूर्ण केला जातो. याशिवाय नरिमन पॉइंट ते वांद्रे, अफगाण चर्च ते पवई तलाव, बाणगंगा ते विधानभवन अशा पर्यटन सफारींचे या समूहांकडून आयोजन केले जाते. काही व्यावसायिक पर्यटन कंपन्याही आता सायकल सहलींचे आयोजन करू लागल्या आहेत. साप्ताहिक सुट्टीरीज सण-उत्सव, राष्ट्रीय सण या सुट्टय़ांनाही अशा सहली आयोजित केल्या जातात. सुमारे आठ-दहा समूह, आठ कंपन्या सध्या असे उपक्रम राबवत आहेत. ‘सायकलिंग टूर ऑफ सेव्हन आयलँड’ या मुंबई सायकलिंग पर्यटनचे विकास कुमार म्हणतात की, यासाठी आठशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. यात सायकलचे भाडे, हेल्मेट, हातमोजे, नी-पॅड, प्रथमोपचार साहित्य, पाणी, सुका खाऊ  इत्यादींचे आयोजन केले जाते.

मुंबईतील ऐतिहासिक स्थळे, समुद्रकिनारे, प्रसिद्ध हॉटेल पाहण्याची पर्यटकांना इच्छा असते. दिवसभर असणाऱ्या वाहतूक वर्दळीमुळे ही ठिकाणे व्यवस्थितपणे पाहता येत नाहीत. त्यासाठी अशा सफरींचे आयोजन केले जाते, अशी माहिती ‘नाइट रायडर्स’ या समूहाचे प्रमुख सोमेश पाटकर यांनी दिली. यामुळे सायकलिंगचा प्रचार होत असल्याचेही ते म्हणाले.

आबालवृद्धांचा सहभाग

सायकलींवरून मुंबई दर्शन घेण्याचा आनंद घेणाऱ्यांमध्ये १५ ते ८५ वयोगटातील मंडळींचा सहभाग असतो, अशी माहिती ‘३६५ होप्स’ या कंपनीच्या विपणन व्यवस्थापक कमला बोरा यांनी दिली. एका चमूत २५ ते ३० जणांचा समावेश असतो. तसेच सहलीच्या आठवडाभर आधी नोंदणी करून घेतली जाते, असेही त्यांनी सांगितले. बहुतांश सहली रात्री साडेअकरानंतर सुरू केल्या जातात.

न्याहरीसाठी सायकलिंग

‘सागरी रायडिंग’अंतर्गत नरिमन पॉइंट ते जुहू चौपाटी अशी सायकल रपेट आयोजित केली जाते. ‘ब्रेकफास्ट सायकल राइड’अंतर्गत सकाळी ८ वाजल्यापासून मुंबईतील इराणी, पारशी, महाराष्ट्रीय, गुजराती खाद्यमेजवानी देणाऱ्या प्रसिद्ध आणि जुन्या हॉटेलांची रपेट मारताना तेथील खाद्यपदार्थाचीही चव चाखली जाते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai darshan from bicycling wheels
First published on: 17-11-2018 at 02:27 IST