मुंबई : पहिल्या फेरीची मुदत ७ जुलै रोजी संपल्यानंतर शिक्षण संचालनालयाने दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग १ मध्ये दुरुस्ती करण्याबरोबरच महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरण्यासाठी १० ते १३ जुलैदरम्यान अवधी देण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या फेरीची यादी १७ जुलै रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

शिक्षण संचालनालयाने अकरावीच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाची मुदत संपल्यानंतर दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील ९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर १० जुलै रोजी सकाळी १० पासून १३ जुलै रोजी सायंकाळी ६.३० पर्यंत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करणे, भाग १ मध्ये दुरुस्ती, नियमित फेरीमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणार आहे. दुसऱ्या फेरीची यादी १७ जुलै रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. दुसऱ्या यादीमध्ये नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १८ ते २१ जुलैदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील २३ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याच कालावधीत कोट्यांतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करता येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीची मुदत ७ जुलै रोजी संपली. या फेरीमध्ये राज्यभरातून ५ लाख ८ हजार ९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. पहिल्या फेरीमध्ये विज्ञान शाखेतून सर्वाधिक १ लाख ४ हजार १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, त्याखालोखाल वाणिज्य शाखेतून ५८ हजार ९४८ आणि कला शाखेतून ३१ हजार १५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर १ लाख २४ हजार ९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आहेत. यापैकी पहिल्या पसंतीचे महाविद्यालय जाहीर झालेले विद्यार्थी वगळता सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच १ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन रद्द केले, यामध्ये कोट्यांतर्गत प्रवेश घेऊन रद्द केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३६१ इतकी आहे. त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयांनी ६ हजार ४०२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले.