मुंबई : उरण येथील चिरनेर गावात गुरुवारी अशक्त हिमालयीन गिधाडाचा बचाव करण्यात आला असून या गिधाडावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चिरनेर परिसरात बर्डफ्ल्यूची साथ असल्याचे घोषित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हिमालयीन गिधाडाची एव्हीयन इन्फ्लूएंझा चाचणी करण्यात आली. चिरनेर गावात निर्जलित आणि कुपोषित अवस्थेतील एक लहान हिमालयीन गिधाड फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेच्या सदस्यांना आढळले होते. त्याचा बचाव केल्यानंतर याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या या गिधाडाला वैद्यकीय उपचारांसाठी ‘रेस्क्युइंग असोसिएशन फॉर वेल्फेअर’(रॉ) या संस्थेकडे सुपूर्द केले. प्रथमदर्शनी गिधाड निर्जलीकरणामुळे अशक्त झाल्याचे दिसून आले. त्यानंतर ते कुपोषित असल्याचेही लक्षात आले.

दरम्यान, गिधाड ज्या गावात आढळले तेथे बर्डफ्लूची साथ पसरली आहे. काही दिवसांपूर्वी चिरनेरमध्ये कुक्कुटपालकाच्या कोंबड्या बाधित होऊन मृत झाल्या होत्या. येथील बर्डफ्ल्यू रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पक्षी मारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रविवारपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच हे गिधाड बर्डफ्ल्यू बाधित क्षेत्रातील एक किलोमीटरच्या परिसरात आढळले आहे. या पार्श्वभूमीवर गिधाडाची एव्हीयन इन्फ्लूएंझाची चाचणी करण्यात आली. यामुळे हिमालयीन गिधाड नेमके कशामुळे अशक्त आणि कुपोषित झाले हे कळण्यास मदत होईल.

नामशेष होण्याच्या मार्गावर

निसर्गाच्या अन्नसाखळीसाठी गिधाड अत्यंत महत्त्वाचा, स्वच्छता राखणारा घटक आहे. मात्र, हा पक्षी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हिमालयीन गिधाड हे अफगाणिस्तान, कझाकस्तान, किर्गीस्तान, उझबेकीस्थान, ताजिकिस्तान, तिबेट, नेपाळ, चीनचा पश्चिम भाग, मंगोलिया या भागात आढळते. तसेच इशान्य भारतातही ते आढळते. थंडीच्या हंगामात हे पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिमालयीन गिधाडाची प्रकृती अत्यंत खालावलेली होती. त्याच्या प्राथमिक वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहोत. मात्र, गिधाड जेथे सापडले ते ठिकाण सध्या बर्डफ्ल्यूबाधित क्षेत्र आहे. त्यामुळे आम्ही काळजी म्हणून एव्हीयन इन्फ्लूएंझाची चाचणी करण्याचे ठरविले आहे. पवन शर्मा, अध्यक्ष, ‘रॉ’